गाईच्या दुधाला 36 रुपये दर द्या ! शिवसेना ठाकरे गटाची गोकुळ दूध संघासमोर निदर्शने
गोकुळ शिरगाव वार्ताहर
गाईच्या दुधाला प्रति लिटर 36 रुपये दर द्या या मागणीसाठी गोकुळ शिरगाव येथील कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) च्या गेट समोर शिवसेना ठाकरे गटाने शनिवारी सकाळी १० वाजता दुधाच्या येणाऱ्या गाड्या आडवुन आंदोलन केले .यावेळी पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
गोकुळ दूध संघाने गायीचा प्रतिलिटरचा शासनाचा दर 34 रुपये असताना कमी केला आहे. त्यामुळे दूध संघ चालकांचे विरोधात हे आंदोलन असून गाईच्या दुधाला दोन रुपये वाढ करून 36 रुपये दूध दर देऊन शेतकऱ्यांचा फायदा करावा असे आव्हान करत शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांनी दूध संघासमोर शिवसेनिकांच्या सह आंदोलन करत गोकुळ दूध संघाचे चेअरमन व संचालक यांचा निषेध व्यक्त केला. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून दूध दरवाढी संदर्भात यांच्यासोबत चर्चा करत असून या संघ चालकांच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्याने आज आपण दूध संघावर मोर्चा काढल्याचे संजय पवार यांनी सांगितले. जर या दूध संघाने 36 रुपये दर नाही केला तर हे आंदोलन आणखीन तीव्र करू असा ईसारा दिला आहे.
शेतकऱ्यांना गाई घ्यायला लावायच्या, बेरोजगार तरुणांना यातून रोजगार उपलब्ध होईल असे सांगायचे ,कर्ज काढायला लावायची आणि इकडे मात्र दुधाच्या दरासाठी शेतकऱ्याला झगडायला लावायचे हा शेतकऱ्यांच्या वर होणारा अन्याय नाही का ? असा सवाल करीत ही दुध दरवाढ नाही केली तर संघाचे चेअरमन व संचालक यांना शिवसेनेच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
शिवसैनिकांचा मोर्चा येणार म्हणल्यावर दूध संकलन नेहमीपेक्षा दोन तास अगोदर घेतले. शिवसेनिकांची व आंदोलनाची एवढी धास्ती आहे तर शेतकऱ्यांना दूध दर वाढ द्यायला बिघडते कुठे.? असा सवाल करत "ये डर होना जरुरी है" असा डायलॉग ही यावेळी संजय पवार यांनी लगावला. यावेळी गोकुळ शिरगाव पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे..
या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार ,विजय देवणे, रविकिरण इंगवले ,तालुकाप्रमुख विनोद खोत, डी .डी .पाटील ,अभिजीत पाटील, शांताराम पाटील, पोपट दांगट ,तानाजी आंग्रे, सुरेश पाटील, सरदार तुपे, डॉ. अनिल पाटील, स्मिता सावंत आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.