शिवराजसिंह चौहान यांना ‘आयएसआय’कडून धमकी
गृह मंत्रालयाने वाढवली सुरक्षा ; भोपाळ-दिल्ली निवासस्थानांसमोर अतिरिक्त फौजफाटा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून जीवे मारण्याची धमकी प्राप्त झाली आहे. पाकिस्तानमधून त्यांना धोका निर्माण होणार असल्याची गुप्तचर माहिती उपलब्ध झाली आहे. शिवराजसिंह यांना आधीच झेड श्रेणीची सुरक्षा मिळत असताना, गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनंतर केंद्र सरकारने आणखी कडक सुरक्षा उपाययोजना जारी केल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाला त्यांच्यावर हल्ला होण्या ची शक्यता असल्याचे इनपुट मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या भोपाळ आणि दिल्ली येथील निवासस्थानांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली. त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. गृह मंत्रालयाकडून त्यांची सुरक्षाव्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. दिल्ली आणि भोपाळमधील त्यांच्या बंगल्यांसमोर बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. मध्य प्रदेशचे डीजीपी, दिल्ली पोलिसांचे विशेष पोलीस आयुक्त (सुरक्षा) आणि मध्य प्रदेशचे मुख्य सचिव यांना मंत्र्यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी स्पष्ट सूचना पाठविण्यात आल्या आहेत.