कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चोरीच्या कमाईतून गावजेवण घालणारा ‘शिवप्रसाद’

12:32 PM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चार राज्यांत चोऱ्यांची व्याप्ती : लुटीनंतर आलेल्या पैशांचा वाटा समाजासाठी खर्च, मठ-मंदिरांनाही देणग्या; चोरीच्या पैशातून अन्नदान करायचा

Advertisement

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या, वाहन चोरीच्या घटना सुरूच आहेत. गुन्हेगार खुलेआम गुन्हे करीत आहेत. पोलीस यंत्रणा सुस्तावल्यामुळे बेळगावातील गुन्हेगारी वाढती आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये फोफावलेली गटबाजीही याला कारणीभूत आहे. बेळगाव येथील चोऱ्यांमागे आंतरराज्य गुन्हेगार सक्रिय असल्याची माहिती आहे. चोऱ्या थोपविण्यासाठी पोलीस यंत्रणा निष्क्रिय बनलेली असतानाच गुलबर्गा पोलिसांनी मात्र तब्बल 260 चोऱ्या करणाऱ्या तेलंगणाच्या गुन्हेगाराला अटक केली आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकासह विविध राज्यात त्याने केलेल्या चोऱ्या, चोरी प्रकरणात सोन्या-चांदीचे दागिने लुटल्यानंतर प्रायश्चितासाठी प्रत्येक वेळी त्याच्याकडून केले जाणारे अन्नदान, धार्मिकस्थळांना त्याने दिलेल्या देणग्या आदींची संपूर्ण राज्यात चर्चा होऊ लागली आहे.

Advertisement

चोरी करणे पाप आहे. ते पाप केल्यानंतर प्रायश्चित करण्यासाठी चोरीतील रक्कम तो कोणत्या कोणत्या कारणासाठी वापरत होता, त्याची कारणे ऐकून तपास अधिकारीही थक्क झाले आहेत. दि. 26 एप्रिल 2025 रोजी मध्यरात्री गुलबर्गा येथील अशोकनगरचे पोलीस निरीक्षक अरुणकुमार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवप्रसाद ऊर्फ मंत्री शंकर (वय 56) याला अटक केली आहे. तो व्यवसायाने कारचालक आहे. तो मूळचा महिमूदगुडा, सिकंदराबाद, सध्या राहणार अन्सरवाडा, ता. निलंगा, जि. लातूर असे त्याचे नाव आहे. गुलबर्गा येथील भाग्यवंतीनगरमध्ये चोरी केल्याची त्याने कबुली दिली. त्याच्याजवळून सुमारे 30 लाख रुपये किमतीचे 412 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. गुलबर्गा येथील अशोकनगर व स्टेशन बाजार पोलीस स्थानकांच्या कार्यक्षेत्रात त्याने दहा चोऱ्या केल्याचे उघडकीस आले.

एखाद्या चोरीनंतर लातूर बसस्थानक किंवा रेल्वेस्टेशनवर दागिने विकून आलेल्या पैशातून तो अन्नदान करायचा. पापक्षालनासाठी अन्नदान व स्वत:च्या मन:शांतीसाठी उरलेला पैसा डान्स बार किंवा क्लबमध्ये उडवायचा. एखाद्या मठ-मंदिरात किंवा जत्रेत चोरीच्या पैशातून तो अन्नदान करायचा. चौकशी दरम्यान त्याने दिलेली कबुली ऐकून तपास अधिकारीही थक्क झाले. वयाच्या 14 व्या वर्षापासून शिवप्रसाद चोऱ्या करतो. मूळचा तेलंगणाचा असला तरी सध्या लातूर जिल्ह्यात त्याचे वास्तव्य होते. आंध्रप्रदेश व तेलंगणामध्ये अडीचशेहून अधिक चोऱ्या केल्या आहेत. गुंडा कायद्याखालीही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती गुलबर्ग्याचे पोलीस आयुक्त डॉ. शरणाप्पा एस. डी. यांनी दिली. पोलीस निरीक्षक अरुणकुमार, वैजनाथ, मल्लिकार्जुन मेत्रे, निलकंठराय पाटील, शिवलिंग, चंद्रशेखर, सुभाष, चन्नवीरेश, अनुजा आदींचा समावेश असलेल्या पोलीस पथकाने अत्यंत वैज्ञानिकपणे तपास करून शिवप्रसादला जाळ्यात अडकविले आहे.

वयाच्या 14 व्या वर्षापासून चोऱ्या करणाऱ्या शिवप्रसादची कौटुंबिक पार्श्वभूमीही विवादित आहे. त्याने एकूण पाच लग्ने केल्याचे उघडकीस आले आहे. तेलंगणा व आंध्रप्रदेशमध्ये त्याच्या चार पत्नी वास्तव्यास आहेत. लातूर जिल्ह्यातील अन्सरवाडामध्ये एका पत्नीसोबत तो राहतो. त्याला आठ अपत्ये आहेत. बंद घरे नेहमी त्याचे लक्ष्य असतात. चोरी केल्यानंतर ठशांचे नमुने मिळू नयेत म्हणून हाताला डिंक लावून तो घरफोडी करीत होता. पोलिसांना तपासाला दिशा मिळेल, असे कोणतेही पुरावे सापडू नयेत यासाठी त्या घराची साफसफाईही करीत होता. 260 पैकी 210 प्रकरणात त्याने बारीकसारीक शिक्षाही भोगली आहे. चार राज्यात वावर असणारा शिवप्रसाद आपण सहजपणे पोलिसांना सापडू नये याची काळजी घेत होता. मात्र, गुलबर्गा पोलिसांनी केलेल्या वैज्ञानिक पद्धतीच्या तपासामुळे तो सहजपणे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

तब्बल 260 चोरी प्रकरणात सहभागी 

भाग्यवंतीनगरमध्ये चोरी करून कुंपणावरून उडी मारून जाताना तो जखमी झाला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. जखमी शिवप्रसादने खासगी इस्पितळात स्वत:वर उपचारही घेतले होते. या एका माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी प्रकरणातील लुटीचा मोठा हिस्सा तो चैनीसाठी उधळत होता. चोरीमुळे आपल्याला पाप लागू नये म्हणून धार्मिकस्थळांमध्ये महाप्रसाद वाटप करत होता. काही मोठ्या मंदिरांमध्ये त्याने देणग्याही दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. तब्बल 260 चोरी प्रकरणात सहभागी असलेल्या शिवप्रसाद ऊर्फ मंत्री शंकरच्या कारनाम्यांची सध्या सर्वत्र चर्चा केली जात आहे.

चोरीला जाण्यापूर्वी देवाला नवस

चोरी प्रकरणातील गुन्हेगारांची मन:स्थिती वेगळी असते. त्यामुळे चोरीला जाण्यापूर्वी कोणी देवाला नवस बोलतात तर आणखी काही जण सोमवारी व शनिवारी कुठल्याही परिस्थितीत चोरी करीत नाहीत. काही गुन्हेगारांच्या चोरीच्या वेळासुद्ध ठरलेल्या आहेत. तसेच गोव्यातून बेळगावला येणारा एक आंतरराज्य गुन्हेगार देवाला साकडे घालूनच बेळगावात प्रवेश करतो. तर काही गुन्हेगार लुटीतून आलेल्या पैशातून नवस फेडतात. देवाला कौल लावून गुन्हे करणारे गुन्हेगारही आहेत. अशा गुन्हेगारांपैकी गुलबर्गा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेला शिवप्रसाद हा गावजेवण घालतो. त्यामुळेच तो ठळक चर्चेत आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article