For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवोलीत गुंडगिरी खपवून घेणार नाही

01:13 PM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवोलीत गुंडगिरी खपवून घेणार नाही
Advertisement

आमदार डिलायला लोबो यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालण्याची मागणी,पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रदीप आगरवाडेकर पिता-पुत्राचे अपहरण!

Advertisement

म्हापसा : आसगाव-बार्देश येथे गेली कित्येक वर्षे वास्तव्य करून राहाणारे प्रदीप आगरवाडेकर यांचे एकमजली राहाते घर दिल्लीस्थित महिलेकडून बाऊन्सर्सच्या मदतीने जबरदस्तीने पाडण्यात आले. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडल्यानंतर गावांत तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, घर पाडण्यास विरोध केल्यामुळे प्रदीप आगरवाडेकर व त्यांच्या मुलाचे शनिवारी संध्याकाळी अपहरण केले. व मारपीट करून रात्री 10 वा. त्या दोघांना आसगाव मंदिराजवळ आणून टाकले. या प्रकरणी  शिवोली मतदारसंघाच्या आमदार डिलायला लोबो यांनी रविवारी सकाळी आगरवाडेकर कुटुंबियांची निवासस्थानी भेट या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला.

या घटनेची माहिती मिळताच हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धांव घेत एक पॉकलेन जप्त केले तर चार कामगारांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आगरवाडेकर कुटुंबियांना कोणतीही नोटीस न बजावता भर पावसात शर्मा नामक बिगरगोमंतकीय महिलेने पोलिसांच्या मदतीने घर पाडले. याबाबत आमदार डिलायला लोबो यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बिगर गोमंतकीय दादागिरी करून अशा प्रकारे घर पाडणे चुकीचे आहे.इतकेच नव्हे तर घराबाहेर बाऊन्सर ठेवले व आगरवाडेकर कुटुंबियांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला. यावेळी एका कारमध्ये आगरवाडेकर पिता-पुत्रांना डांबून त्यांचे अपहरण करण्यात आले. व सहा तासानंतर त्यांना रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मारपीट करून आसगाव घाटेश्वर मंदिराजवळ टाकून त्या कार चालकाने पळ काढला.

Advertisement

दरम्यान, हा प्रकार पूर्णपणे अपहरणाचा असून राज्यात गुंडगिरी वाढलेली आहे, अशी गुंडगिरी शिवोलीत खपवून घेणार नाही, असे आमदार डिलायला लोबो यांनी बजावले. मुख्यमंत्र्यांनी त्वरित दखल घेऊन या घटनेमागची पार्श्वभूमी समजून घ्यावी. हणजूण पोलीस स्थानकाने याची दखल अद्याप का घेतली नाही? जेसीबीच्या साहाय्याने अर्धे घर पाडले तेव्हा आगरवाडेकर कुटुंबीय घर पाडण्यास विरोध करू लागले तेव्हा पिता-पुत्राला गाडीत डांबून त्यांचे अपहरण केले. राज्यात काय चालले आहे. पोलीस जनतेचे रक्षक की भक्षक आहेत? असा सवाल आमदारांनी केला. आगरवाडेकर कुटुंबियांकडे  घराची कागदपत्रे असताना बाऊन्सरचा धाक दाखवून. दिल्लीतील शर्मा नामक इसम त्यांचे राहते घर पाडतो, अशी दादागिरी सहन करणार नाही, असे आमदार डिलायला लोबो योनी सांगितले.

पूर्वकल्पना न देता घरावर बुलडोझर चढविणे, वीज खंडित करणे ही गुंडगिरीच!

आसगाव पंचायतीचे सरपंच हनुमंत नाईक म्हणाले की, शनिवारी आगरवाडेकर कुटुंबियांना कोणतीही पूर्व कल्पना न देता त्यांचे राहते घर बुलडोझरने पाडले. याबाबत पंचायत वा संबंधित खात्याला त्याची पूर्वकल्पना देण्यात आली नाही. वीजखात्याला न कळवता वीजही शर्मा यांनी तोडली. स्थानिक आमदार डिलायला लोबो यांच्याकडे हा प्रश्न मांडला असून याबाबत हणजूण पोलीस स्थानकात आमदारांच्या उपस्थितीत आगरवाडेकर कुटुंबियांनी लेखी तक्रार दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन आगरवाडेकर कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी हनुमंत नाईक यांनी केली आहे. दरम्यान, आगरवाडेकर पिता-पुत्राच्या अपहरण प्रकरणी बिल्डर पूजा शर्मा हिच्या विरोधात हणजूण पोलीस स्थानकात गुन्हा नेंद करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आमचे घर पुन्हा उभारून आम्हाला न्याय द्या : आगरवाडेकर कुटुंबीय

आम्हाला या प्रकरणी न्याय द्यावा. आमचे पाडलेले घर आम्हाला पुन्हा बांधून द्यावे. आम्ही बेघर झालो आहोत. कारवाई करावी. अपहरणकर्त्यांना ताब्यात घेऊन अटक करावी. घर पाडणारी जेसीबी जप्त करावी, अशी मागणी आगरवाडेकर कुटुबियांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी आगरवाडेकर कुटुंबियांनी यावेळी पोलीस स्थानकात केली.

Advertisement
Tags :

.