आपत्कालीन मदत पुरविणाऱ्या मोबाईल वाहनांना चालना
बेंगळूर : परिवहन महामंडळाच्या बसेस अपघात आणि बिघाड झाल्यास आपत्कालीन मदत पुरविण्यासाठी मोबाईल वाहनांना परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी चालना दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केएसआरटीसी बसेस अपघात आणि बिघाड झाल्यास वाहने त्वरित दुऊस्त करण्यासाठी या वाहनांचा मोबाईल वर्कशॉप मॉडेलमध्ये समावेश करण्याचा हेतू आहे, असे सांगितले. बेंगळूर आणि म्हैसूरमधील मध्यवर्ती ठिकाणी ही वाहने तैनात केली जात आहेत. त्यामुळे बेंगळूर, तुमकूर, कोलार, चिक्कबळ्ळापूर, म्हैसूर, मंड्या आणि आसपासच्या परिसरात होणाऱ्या अपघातांना त्वरित प्रतिसाद देणे सोपे होईल. केंपेगौडा बस स्थानक आणि म्हैसूर रोड बस स्थानकावरून राज्य आणि आंतरराज्याच्या विविध भागांमध्ये विविध प्रकारच्या बसेस धावत असतात. तांत्रिक बिघाडांमुळे विविध ठिकाणी बसेस बिघाड झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्या सोडवण्यास या वाहनामुळे मदत होईल. त्यामुळे जनतेची गैरसोय दूर होणार आहे, असेही मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी स्पष्ट केले.