शिवकुमारांच्या दिल्ली दौऱ्यामुळे तर्कवितर्क
‘नोव्हेंबर क्रांती’ची चर्चा रंगली असतानाच हायकमांडची भेट घेणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंत्रिमंडळ पुनर्रचना, मुख्यमंत्री बदल, ‘नोव्हेंबर क्रांती’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्ली दौरा हाती घेतला आहे. बुधवारी ते काँग्रेस हायकमांडच्या भेटीसाठी नवी दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याविषयी तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री बदलाबाबत सध्या काँग्रेस गोटात व्यापक चर्चा होत आहे. सिद्धरामय्या आणि त्यांच्या समर्थक मंत्री, आमदारांनी सध्यातरी नेतृत्त्व बदल होणार नाही, असे विधान केले आहे. असे असतानाच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता बेंगळूरहून दिल्लीला प्रस्थान केले. राज्यात नेतृत्त्व बदलासंबंधी चर्चा रंगली असतानाच शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील पाणीपुरवठा योजनांसंबंधी वकिलांशी चर्चा करण्यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी रात्री दिल्लीतील कर्नाटक भवनमध्येच त्यांनी वास्तव्य केले. गुरुवारी ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
मंत्रिमंडळ पुनर्रचनेसंबंधी वरिष्ठांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे 15 नोव्हेंबर रोजी दिल्लीला जातील. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार असल्याचे सिद्धरामय्या यांनी सांगितले होते. तत्पुर्वीच शिवकुमार दिल्लीला गेले आहेत.
राज्य भाजपकडून खिल्ली
राज्य काँग्रेस सरकारमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या मुद्द्यावरून अनेक नेत्यांनी उघडपणे वक्तव्ये केली आहेत. आता याच मुद्द्यावरून राज्य भाजपने सोशल मीडिया ‘एक्स’वर गाणे अपलोड करून राज्य सरकारची खिल्ली उडविली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि मंत्री सतीश जारकीहोळी यांना नोव्हेंबर क्रांतीचे काउंटडाऊन, अशा आशयाची टिप्पणी त्यात करण्यात आली आहे.