सिद्धरामय्या चिरंजीवाच्या वक्तव्यानंतर शिवकुमार समर्थक आक्रमक
बेळगावच्या थंडीतही वातावरण तापले
बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव डॉ. यतिंद्र यांच्या वक्तव्यानंतर बेळगावातही सत्तासंघर्षाची धार वाढली आहे. पाच वर्षांपर्यंत सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री असणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर डी. के. शिवकुमार समर्थक आक्रमक झाले आहेत. गेल्या आठवड्यात हायकमांडच्या सूचनेनुसार सिद्धरामय्या व डी. के. शिवकुमार यांनी एकमेकांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट मिटिंग करून आम्ही दोघे एक आहोत, हे दाखवण्याचे प्रयत्न केले होते. या विषयावर कोणीही उघडपणे वक्तव्य करू नये, अशी लक्ष्मणरेषा हायकमांडने घातली होती. सिद्धरामय्या यांच्या चिरंजीवांनी ती लक्ष्मणरेषा ओलांडली आहे.
या वक्तव्यानंतर शिवकुमार समर्थक आमदार इक्बाल हुसेन, शिवगंगा बसवराज, गणिग रवी, आदींनीही नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकातील प्रत्येक घडामोडीवर हायकमांडचे लक्ष आहे. त्यामुळे उघडपणे कोणीही या मुद्द्यावर वक्तव्य करू नये, असे शिवकुमार समर्थकांनी स्पष्ट केले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनीही हायकमांड जे ठरवेल तेच अंतिम आहे. आता यासंबंधी चर्चेची गरज नाही, असे सांगितले आहे.
या घडामोडीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी रात्री सर्किट हाऊस येथे डॉ. एच. सी. महादेवप्पा, सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील, के. एच. मुनियप्पा आदी मंत्र्यांशी चर्चा केली आहे. या घडामोडींमुळे बेंगळूरनंतर बेळगावातही आता नेतृत्वबदलाच्या चर्चेने उचल खाल्ली असून मंगळवारी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार अधिवेशनात भाग घेण्यासाठी बेळगावला येणार आहेत. त्यानंतर या चर्चेला कसे वळण लागते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.