For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवेंद्रसिंहराजेंचे ‘हरित सातारा’ मिशन

05:46 PM May 31, 2025 IST | Radhika Patil
शिवेंद्रसिंहराजेंचे ‘हरित सातारा’ मिशन
Advertisement

सातारा :

Advertisement

सातारा जिह्यात पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने 1 जून रोजी सकाळी 8 वाजता पोलीस परेड ग्राऊंडपासून वृक्षलागवड अभियानास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. या अभियानात 8 ते 10 फूट उंचीची विविध प्रकारची 2 हजार 800 झाडे लावण्यात येणार असून या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळाचे 110 कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे साताऱ्यात जणू ‘हरित सातारा’ मिशन सुरू झाल्याचे चित्र निर्माण होणार आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साताऱ्यात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 जूनपासून वृक्ष लागवड अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानास जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता (पूर्व) श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता (पश्चिम) राहुल अहिरे, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, दिशा कमिटीच्या सदस्या रेणू येळगावकर, हरित सातारा संस्थेचे कन्हैयालाल पुरोहित व सदस्य तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेल्हे शिक्रापूर-जेजुरी-लोणंद-सातारा या राज्य मार्गावर (कि.मी. 190/00 ते कि.मी. 193/300) पोवई नाका ते वाढे फाटा यादरम्यान 3.3 कि.मी. लांब मार्गाच्या दुतर्फा 1 हजार 514 झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने बहावा, कदंब, अर्जुन, पुत्रवती, कांचन, चकृळ, पुत्राजिवा, कडूनिंब, कुंकू, मोहगणी, खडशिंग, करंज यांसारख्या औषधी व सेंद्रिय उपयोगी वृक्षांचा समावेश आहे. या झाडांची उंची 8 ते 10 फूट इतकी असून 330 एक्झोरा व पावडर पफसारख्या आकर्षक सजावटीच्या झाडांचाही समावेश आहे. या अभियानात सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत 110 कर्मच्रायांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असून पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकही सहभागी होणार आहेत. याच दिवशी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते सातारा नगरपालिकेच्यावतीनेही वृक्ष लागवड मोहिमेला सुरूवात होणार आहे. आयोध्यानगरी ते दत्त मंदिर, हुतात्मा स्मारक नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते मोळाचा ओढा, सदरबझारमधील जेसीओ कॉलनी परिसरात सोनचाफा, ताम्हीण, बॉटल ब्रश, जांभूळ, पारिजातक, पळस, आवळा, उंबर, कुसंबी, गोरख चिंच अशा विविध प्रकारचे 1 हजार 200 झाडे लावण्यात येणार आहेत. या भव्य वृक्षलागवड मोहिमेमुळे सातारा जिह्याचा पर्यावरणी समतोल सुधारण्यास मदत होणार आहे. हे अभियान म्हणजे ‘हरित सातारा, स्वच्छ सातारा‘ ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्यादृष्टीने हे एक मोठं पाऊल ठरणार आहे. या अभियानात सहभागी होणाऱ्यांना नगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Advertisement

या अभियानात शाळा, महाविद्यालये, सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सातारा सार्वजनिक बांधकाम मंडळ व सातारा नगरपरिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

  • साताऱ्याच्या फुफ्फुसांसाठी सेवाभावी संस्थांनी योगदान द्यावे !

‘वृक्ष ही निसर्गाची श्वासवाहिनी असून साताऱ्याच्या फुफ्फुसांना हिरवळ देण्याची वेळ आली आहे. वृक्षलागवड हा केवळ उपक्रम नाही, तर भविष्याच्या श्वासासाठीची शपथ आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रेरणेने होत असलेल्या या पर्यावरण क्रांतीचे सेवाभावी संस्थांनी भागीदार व्हावे... हरित साताऱ्यासाठी एक पाऊल... तुमचंही योगदान आवश्यक... निसर्गाला साथ द्या‘, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.