शिवय्या पुजारी ‘किणये ग्रामीण केसरी’चा मानकरी
कामेश पाटीलचा प्रेक्षणीय विजय
वार्ताहर /किणये
बाल हनुमान कुस्तीगीर संघटना, किणये यांच्या वतीने खास श्री चौराशीदेवी यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदानात शिवय्या पुजारीने महाराष्ट्रच्या उदय खांडेकरचा 9 व्या मिनिटाला एकेरी हाताचा कस चढवून चितपट करीत किणये ग्रामीण आमदार केसरीचा मानकरी ठरला. महाराष्ट्र चॅम्पियन मामासाहेब मोहोळ तालीम पुणे येथील उदय खांडेकर विरुद्ध कर्नाटक केसरी मठपती आखाडा शिवय्या पुजारी यांच्यात प्रथम क्रमांकची कुस्ती युवा नेते मृणाल हेब्बाळकर, मारुती डुकरे, डॉ. कृष्णा पाटील, वीर पाटील, कल्लाप्पा नाईक, लक्ष्मण पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकदीचा अंदाज घेतला. प्रारंभी उदय खांडेकरने एकेरीपट काढून शिवय्या पुजारीवर ताबा मिळविला. त्यातून शिवय्याने सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला शिवय्याने पायाला आकडी लावून खाली घेत मानेचा कस काढण्याचा प्रयत्न केला. नवव्या मिनिटाला पुजारीने एकेरी पट काढून उदयवर ताबा मिळवत एकेरी हाताचा कस चढवून उदय खांडेकरला चितपट करून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. पंच म्हणून महेश डुकरे यांनी काम पाहिले.
महिला कुस्ती
आखाड्यात महिलांच्या कुस्तीत स्वाती पाटील कडोली, जानवी पाटील किणये व प्रांजल अनगोळ यांनी विजय मिळविला. मेंढ्याच्या कुस्तीत चुरशीची लढत समर्थ पाटील किणये व स्वयंम उचगाव यांच्यात लावण्यात आली. ही कुस्ती अतिशय रंगतदार अशी झाली. तिसाव्या fिमनिटाला ही कुस्ती बरोबरीत सोडविली. या कुस्तीसाठी पंच म्हणून राजू पाटील व संभाजी गुरव यांनी काम पाहिले. दुसऱ्या मेंढ्याच्या कुस्तीत विठ्ठल गुरव किणये व पृथ्वीराज अवचारहट्टी यांच्यात लावण्यात आली. चौथ्या मिनिटाला विठ्ठलने निकाल डावावर पृथ्वीराज याला चितपट करून मेंढ्याच्या कुस्तीचा मानकरी ठरला. पंच म्हणून पिराजी मुचंडीकर यांनी काम पाहिले.
वैष्णव गुरव गदेचा मानकरी..
गदेच्या कुस्तीसाठी वैष्णव गुरव किणये व शिवानंद येळ्ळूर यांची कुस्ती अशोक डुकरे व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. तिसऱ्या मिनिटांवर वैष्णव गुरवने घिस्सा डावावर शिवानंदला चितपट करून गदेचा मानकरी ठरला. मान्यवरांच्या हस्ते गदा बक्षीस देऊन त्याला गौरवण्यात आले.