‘कॅम्पमधील हायस्ट्रीट’ला शिवरायांचे नाव
‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’ नामकरण, : कॅन्टोन्मेंट बैठकीत मंजुरी : ऐतिहासिक निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंटने रस्त्यांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कॅम्पमधील हायस्ट्रीट या मुख्य बाजारपेठेच्या रस्त्याला ‘छत्रपती शिवाजी महाराज रोड’ असे नामकरण करण्यास मंजुरी दिली. याबरोबरच कॅन्टोन्मेंटच्या इतर रस्त्यांना देशासाठी बलिदान दिलेल्या डॉ. विक्रम बत्रा, संदीप उन्नीकृष्णन यासह इतर सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. सोमवारी झालेल्या कॅन्टोन्मेंटच्या बैठकीमध्ये नामकरणाला मंजुरी देण्यात आली.
कॅन्टोन्मेंटच्या बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अनेक कामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डचे चेअरमन ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, सीईओ राजीव कुमार व नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते.
किल्ला येथील जुने भाजी मार्केटमधील गाळे पाडले जाणार असून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. यामुळे कॅन्टोन्मेंटला चांगला महसूल उपलब्ध होणार आहे. याबरोबरच कमल बस्ती परिसराच्या सौंदर्यीकरणाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. फिश मार्केट, रामकृष्ण मिशन, वनिता विद्यालय परिसर यासह अन्य तीन जागा भाडेतत्वावर दिल्या जाणार आहेत. सीपीएड मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमांना यापुढे दिवसासाठी 1 हजार रुपये भाडे तर 500 रुपये स्वच्छता कर जमा करावा लागणार आहे. युवा म. ए. समितीने आक्षेप घेऊन देखील बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डचे बेळगावी कॅन्टोन्मेंट बोर्ड असे नामकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.
महसूल बुडविणाऱ्या कंत्राटदाराला घातले काळ्या यादीत
महसूल वाढीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डने तेरा ठिकाणी होर्डिंग बसविण्यासाठी कंत्राट दिले होते. बेळगावच्या कल्पना आर्ट्स या कंत्राटदाराने होर्डिंगसाठीचे 24 लाख 7 हजार 661 रुपये थकविले आहेत. अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील कंत्राटदाराकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने संबंधित कंत्राटदाराला पुढील दहा वर्षांसाठी काळ्या यादीत घालण्यात आले आहेत. याबरोबरच कॅन्टोन्मेंटमध्ये एलईडी दिव्यांची चोरी होत असल्याचा मुद्दा समोर आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मराठी, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील निकाल चिंताजनक लागल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. शाळांमधील गुणवत्ता राखली जावी, यासाठी निवृत्त मुख्याध्यापिकेला निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. क्रीडाक्षेत्रात शाळांनी चांगली कामगिरी केली असली तरी शैक्षणिक प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. यासाठी कॅन्टोन्मेंटने समितीचीही स्थापना केली आहे. या समितीअंतगृ शाळा व्यवस्थापन तसेच गुणवत्तेबाबत लक्ष ठेवले जाणार आहे. शाळांच्या नामकरणासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु, यासाठी मोठा निधी लागणार असल्याने नामकरणाचा प्रस्ताव तूर्तास बाजूला ठेवण्यात आला.
अन्नपदार्थ तपासणी समितीची स्थापना कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये अनेक लहान-मोठे स्टॉल, मोठी हॉटेल, बेकरी, स्वीटमार्ट यासह इतर केटरिंगचे व्यवसाय चालविले जातात. अन्नपदार्थ तयार करताना स्वच्छता तसेच गुणवत्ता राखली जाते की नाही? याची तपासणी करण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डकडून एक समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती कॅन्टोन्मेंटमधील कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन तपासणी करू शकते. यापूर्वी काही हॉटेल, बेकरींवर कॅन्टोन्मेंटने कारवाई केल्याचे बैठकीदरम्यान सांगण्यात आले. |