पोक्सो प्रकरणात मुरुघ मठाचे शिवमूर्ती स्वामीजी निर्दोष
बेंगळूर : दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असणाऱ्या चित्रदुर्गमधील मुरुघ मठाचे शिवमूर्ती स्वामीजी यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे. चित्रदुर्ग जिल्हा अतिरिक्त आणि सत्र न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला. स्वामीजींवर मुलींचे लैंगिक शोषण आणि अत्याचाराचा आरोप झाला होता. या प्रकरणासंबंधी 18 नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण करून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. बुधवारी न्यायमूर्ती गंगाधर चन्नबसप्पा हडपद यांनी हा निकाल जाहीर केला. निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने दावणगेरेच्या विरक्त मठातून स्वामीजी कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले. शिवमूर्ती स्वामीजींच्या वतीने वकील सी. व्ही. नागेश यांनी युक्तिवाद केला.
काय आहे प्रकरण?
आपल्या मुलीसह इतर मुलींचे शिवमूर्ती स्वामींजींनी लैंगिक शोषण केले आहे, असा आरोप करत चित्रदुर्गच्या मुरुघ मठात स्वयंपाक काम करणाऱ्या महिलेने पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे म्हैसूरमधील नजाराबाद पोलीस स्थानकात 13 ऑक्टोबर 2022 रोजी दोन एफआयआर दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले होते. यातील एका प्रकरणात ते निर्दोष ठरले.
एफआयआरमध्ये शिवमूर्ती स्वामीजींविरुद्ध भा. दं. वि. च्या सेक्शन 376(के), 376(2)(एन), 376(एबी), 376(3), 366, 366(ए), 323, 144 आणि 34 तसेच पोक्सो कायद्याच्या सेक्शन 5(एल), 6, 7 आणि 17, धार्मिक संस्थांचा दुरुपयोग प्रतिबंधक कायद्याच्या सेक्शन 3(एफ) आणि 7, बालन्याय कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणी 1 सप्टेंबर 2022 रोजी शिवमूर्ती यांना अटक करण्यात आली होती. 14 महिने कारागृहात असलेल्या स्वामीजींना 16 नोव्हेंबर 2023 रोजी सशर्त जामीन देण्यात आला होता. यातील एका प्रकरणात न्यायालयाने स्वामीजींना दिलासा दिला असून निर्दोष ठरविले आहे.