पुढील तीन महिन्यात शिवकुमार मुख्यमंत्री होतील!
आमदार इक्बाल हुसेन यांचे वक्तव्य : राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात काँग्रेस सत्तेवर येण्यासाठी कोणाचे परिश्रम किती आहे याची स्पष्ट माहिती हायकमांडला आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार आहेत, असे वक्तव्य करून रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी राज्यातील राजकीय बदलांच्या विधानांना आणखी एक आयाम दिला आहे. परिणामी, राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात राज्य राजकारणात मोठे बदल होतील, असे भाकित सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी काही दिवसांपूर्वीच केले होते. दरम्यान, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ताकिद दिल्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यात बदल करत काँग्रेससह भाजपमध्येही बदल होतील, असे म्हटले आहे. राजकीय बदलाबाबत राजण्णा यांनी केलेले वक्तव्य गांभीर्याने घेतलेले नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले होते.
मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह अनेक नेत्यांनी राजण्णा यांच्या वक्तव्याचे समर्थन केले होते. सिद्धरामय्या गटातील मंत्री आणि आमदारांनी सप्टेबरमध्ये राजकीय बदल होणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलतील, मंत्रिमंडळाची पुनर्रचना होईल, असे सांगत असतानाच डी. के. शिवकुमार यांचे निकटवर्तीय रामनगर मतदारसंघाचे आमदार इक्बाल हुसेन यांनी आणखी एक स्फोटक विधान करून सिद्धरामय्या गटाला टोला लगावला आहे.
पुढील दोन-तीन महिन्यात डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. मी माझे म्हणणे थेट मांडतो. सर्वांच्या वक्तव्यानुसार राजकीय बदल होतील. डी. के. शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतील, असे आमदार इक्बाल हुसेन यांनी स्पष्ट केले आहेत.
2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला किती जागा मिळाल्या होत्या. आमचे संख्याबळ किती होती, याची माहिती सर्वांना आहे. डी. के. शिवकुमार यांनी पक्षाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर राज्यात ‘भारत जोडो यात्रा’ यशस्वी केली होती. मेकेदाटू यदयात्रेसह अनेक कार्यक्रम इतिहासातच झाले नव्हते. कोरोना काळातही शिवकुमार यांनी उत्कृष्ट काम केले होते. शिवकुमार यांचे परिश्रम, राजकीय रुपरेषा, इच्छाशक्ती सर्वांच्या डोळ्यासमोर आहे. ते हायकमांडच्या निदर्शनासही आले आहे. त्यामुळे हायकमांड योग्यवेळी योग्य निर्णय घेईल, असेही ते म्हणाले.