Satara : शिवाजीनगरचा 21 दिवसांचा गणपती अव्वल !
उंब्रज विभागात प्रथम क्रमांकाच्या गणराया अवॉर्डने सन्मान
उंब्रज : सातारा जिल्हा पोलीस अंतर्गत पोलीस उपविभाग कराड यांनी आयोजित केलेल्या श्री गणराया अवॉर्डस्मध्ये कराड तालुक्यातील उंब्रज विभागात शिवाजीनगर मांगवाडी येथील हनुमान भजनी गणेश मंडळ अब्बल ठरले. या मंडळाला प्रथम क्रमांकाचे गणराया अवॉर्ड देऊन पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कहूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
कराड तालुक्यातील शिवाजीनगर (मांगवाडी) येथील हनुमान भजनी गणेश मंडळाच्या माध्यमातून शेकडो वर्षांपासून 'एक गाव एक गणपती परंपरा जोपासली आहे. तसेच २१ दिवसांचा नवसाचा गणपती म्हणून पंचक्रोशीत या मंडळाची ओळख आहे. यावर्षी जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या श्री गणराया अवॉर्डस् २०२५ मध्ये या मंडळाने सहभागी होऊन उंब्रज विभागात प्रथम क्रमांकाचा मान मिळवला.
मंडळाच्या वतीने प्रदूषणमुक्त उत्सव साजरा करत पारंपरिक दिंडीने गणपती बाप्पांचे आगमन केले. तसेच लाईफ स्प्रिंग हेल्थकेअर कॅन्सरमुक्त नारी अभियान, इस्लामपूर यांच्यामार्फत महिलांची आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम घेण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात व गावातील अन्य ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामपंचायत व मंडळाच्या पुढाकाराने गावातील घरगुती गणेश मंडळाचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रमार्फत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य शिबिर, औषधोपचार शिबिर राबवून १९४ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आभा कार्ड व इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावात शिबिर राबविण्यात आले. शिबिरात ग्रामस्थांची रक्त तपासणी करण्यात आली.
एकवीस दिवसांच्या उत्सव काळात विविध भजनी मंडळांना आमंत्रित करून भजन, कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम राबवण्यात आले. सत्यनारायण महापूजेला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. सुमारे पाच हजारावर अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आदर्श मिरवणूक
विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. डॉल्बी, बँजोसारख्या कर्णकर्कश वाद्यांना फाटा देऊन टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम, दिंडी व महिलांचा सहभागाने विसर्जन मिरवणूक काढली. या सर्व बाबींचा विचार करून हनुमान भजनी गणेश मंडळास प्रथम क्रमांकाचा गणराया अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.