शिवाजी विद्यापीठाच्या कुस्ती संकूलाचे काम अंतिम टप्प्यात; मॅटवरील कुस्तीची दोन मैदाने तयार
दोन फ्लोअर अन् आधुनिक साहित्य बसवण्याचे काम सुरू
अहिल्या परकाळे कोल्हापूर
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅटवरील कुस्ती स्पर्धेत कोल्हापुरच्या पैलवानांची कामगिरी दर्जेदार व्हावी. पुणे-मुंबईसारख्या अत्याधुनिक सुविधा आपल्या पैलवानांना मिळव्यात यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे अत्याधुनिक कुस्ती संकुल उभारण्याचे कामकाज सुरु आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आले असून महिला व पुरुषांची अशी दोन मॅटवरील कुस्तीची मैदाने तयार केली आहेत. दोन फ्लोअरसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर देखील याठिकाणी करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे तयार करण्यात येत असलेले अद्ययावत कुस्ती संकूल राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना एक प्रकारे अभिवादन ठरणार आहे. विशेष म्हणजे, या कुस्ती संकूलामध्ये विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शालेय ते पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सराव करता येणार आहे.
शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने स्वनिधीतून मॅटवरील कुस्ती संकुलासाठी 2 कोटी रुपये खर्च केले आहेत. एकाच ठिकाणी मुली आणि मुलांना मॅटवरील कुस्तीचा सराव करता यावा म्हणून उभारण्यात आलेली दोन्ही कुस्तीसंकुल भव्य-दिव्य झाली आहेत. चारही बाजू आणि वरील छतही बांधून पूर्ण झाले आहे. दोन फ्लोअरसह अंतर्गत सुविधा अजून बाकी असून हे कामही लवकर पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दरम्यान, या कुस्ती संकुलात विद्यार्थ्यांना मॅटच्या कुस्तीचे आधुनिक पध्दतीने प्रशिक्षणही दिले जाणार आहे. यामुळे कोल्हापुरच्या मुलांना मॅटवरील कुस्तीसाठी पुणे, मुंबईला जावे लागणार नाही. विशेष म्हणजे, याठिकाणी राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धाही आयोजित केल्या जाणार आहेत.
अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज
शिवाजी विद्यापीठातील कुस्ती संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॅट व इलेक्ट्रॉनिक गॅझेट बसवण्यात येणार आहे. तसेच कुस्तीपटूंना सरावासाठी जीमही तयार करण्यात येणार आहे. या कुस्ती संकुलात दिवसभर सुर्यप्रकाश येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विजेच्या खर्चात कपात होईल. 600 लोकांची बैठक व्यवस्था आहे. अर्थात, जास्तीत जास्त सुविधा देत मॅटवरील कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांची फौज तयार करण्यावर क्रीडा विभागाचा भर असणार आहे.
पैलवानांना या सुविधा मिळणार
क्रीडा विभागाशेजारी व एनसीसी भवनच्या पाठीमागे कुस्ती संकुल उभारण्यात येत आहे. पैलवानांना जीम, चेंजिंग रूम आणि याशिवाय इतर सुविधाही येथील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. खेळाडूंच्या वसतिगृहाचे काम सुरू असून या वसतिगृहात राहून पैलवानांना कुस्तीचा सराव करता येणार आहे. तसेच आधुनिक पध्दतीचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील तंत्रज्ञान पैलवानांना वापरता येईल.
अधिकार मंडळाच्या मान्यतेने उद्घाटन
शिवाजी विद्यापीठातील मॅटवरील कुस्ती संकुलाचे फ्लोअरचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व अधिकार मंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाणार आहे. फ्लोअरचे कामही मोठ्या गतीने सुरु आहे. सर्व अधिकार मंडळाच्या मान्यतेने कुस्ती संकुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.