शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त शिवमंदिरे फुलली
रुद्राभिषेक, महाआरती, महाप्रसादाचे आयोजन : महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची उशिरापर्यंत गर्दी
वार्ताहर/सांबरा
शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त पूर्वभागातील अनेक शिव मंदिरांमध्ये रुद्राभिषेक, महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्व शिवमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली होती. तर महाप्रसाद घेण्यासाठी हजारो भाविकांनी उशिरापर्यंत गर्दी केली होती.
कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिर
डोंगरमाथ्यावर निसर्ग सौंदर्याच्या कुशीत वसलेल्या श्री सिद्धेश्वर मंदिर येथे सोमवारी महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. प्रारंभी पहाटे मंदिरात पूजा, अर्चा, अभिषेक कार्यक्रम पार पडले. तर सकाळी दहा वाजता पूजन करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी देवस्थान कमिटीने तयारी केली होती. दर्शन घेऊन भाविक महाप्रसादाचा लाभ घेत होते. त्यामुळे मंदिरकडे दर्शनासाठी व मंदिराच्या पायथ्याकडे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. अधूनमधून पावसाच्या सरीही कोसळत होत्या. मात्र पावसाची तमा न बाळगता भाविक दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी मंदिर परिसरात आवर्जून उपस्थित होते. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती.
निलजी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिर
सालाबादप्रमाणे निलजी येथील श्री ब्रह्मलिंग मंदिरात श्रावण मासानिमित्त महाप्रसाद(परव)चे आयोजन केले होते. मंदिरात सकाळी अभिषेक व पूजा झाल्यानंतर पालखी सेवा झाली. त्यानंतर दुपारी दोन वाजता गाऱ्हाणे घालून पूजा करण्यात आली व दुपारी चारनंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती.
श्री सिद्धेश्वर मंदिर मुचंडी
मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात सकाळी रुद्राभिषेक, महाआरती झाली. तर सकाळी दहा वाजता गावातील गदगेपासून सर्वांचे पालखी मिरवणूक मंदिरपर्यंत नेण्यात आली. दुपारी बारा वाजता पूजन करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुचंडी परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती.
बाळेकुंद्री खुर्द श्री कलमेश्वर मंदिर
येथील श्री कलमेश्वर मंदिरात पहाटे पाच वाजता अभिषेक, पूजा व आरती झाली. दरम्यान दिवसभर भक्तांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती. दुपारी तीननंतर पूजन करून महाप्रसाद वाटपाला सुरुवात करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
राजहंसगड सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसाद
राजहंसगडावरती सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे सोमवार दि. 18 रोजी देवस्थान पंचकमिटी व गावच्यावतीने आयोजित महाप्रसादाचे वाटप उत्साहात पार पडले. प्रत्येक वर्षी श्रावण मासातील शेवटच्या सोमवारी राजहंसगडावरील श्री सिद्धेश्वर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. त्याचपद्धतीने सोमवार दि. 18 रोजी सकाळी सिद्धेश्वर मंदिरातील देवाला ह.भ.प. शिवानंद मठपती यांच्या सानिध्यात अभिषेक घालून देवाचे पूजन व आरती झाली. याप्रसंगी देवस्थान पंचकमिटी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर दुपारी 2 वा. महाप्रसादाला सुरुवात झाली. गावातील आणि पंचक्रोषीतील भाविकांनी पावसातही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.
धामणेत बसवाण्णा देवाचा महाप्रसाद
धामणे येथील बसवाण्णा देवाचा महाप्रसाद पाऊस सुरू असतानाही हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. येथील परव कमिटीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शेवटचा श्रावण सोमवार दि. 18 रोजी बसवाण्णा मंदिर येथे महाप्रसादाचे वाटप भक्तीमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. सोमवारी पहाटे 4 ते 6 परव कमिटीतर्फे बसवाण्णा देवाला बाहुबली पुजेरी, सागर पुजेरी यांच्या सानिध्यात अभिषेक व विधीवत पूजन करून महाआरती केली. याप्रसंगी गावातील व पंचक्रोषीतील शेकडो भाविक उपस्थित होते. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. शिवसेना उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी परव कमिटीच्या सदस्यांचा सत्कार केला.
कडोली श्री कलमेश्वर मंदिरात महाप्रसाद
येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा भर पावसातही हजारो भक्तांनी लाभ घेतला. श्रावण मासानिमित्त दरवर्षी जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी पावसाची संततधार सुरू असल्याने देवस्थान कमिटीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तरी भाविकांना सुरळीतपणे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
आंबेवाडी येथील श्री घळगेश्वर मंदिरात अभिषेक-महाप्रसाद वाटप
आंबेवाडी येथील जागृत श्री घळगेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून बुधवार दि. 18 रोजी गाभाऱ्यातील शिवलिंग मूर्तीला अभिषेक व पूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम देवस्की पंच व येथील ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केला होता. कार्यक्रमाला गावातील व इतर गावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त सर्व भाविकांसाठी दुपारी 2 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले होते. महाप्रसादाचे उदघाटन म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिक उपस्थित होते. भाविकांना महाप्रसाद वाटप केले.
विजयनगर शिवगिरी श्री शिव मंदिरात रुद्राभिषेक
येथील विजयनगर पाईपलाईन रस्त्यालगत असलेल्या जागृत शिवगिरी श्री शिवलिंग मंदिरात सालाबादप्रमाणे शेवटच्या श्रावण सोमवारी गाभाऱ्यातील मूर्तीला रुद्राभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सकाळी 11 वाजता या रुद्राभिषेक कार्यक्रमास प्रारंभ झाला. या पूजन कार्यक्रमानंतर दुपारी 2 नंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. असंख्य भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराचे व्यवस्थापक पी. सी. कोकितकर व नागरिकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.