वडगाव परिसरात अवतरली शिवसृष्टी
सजीव देखावे, ढोल-ताशा पथकांचे आकर्षण, चित्ररथ पाहण्यासाठी शिवभक्तांची गर्दी : मध्यरात्री उशिरापर्यंत मिरवणूक
पारंपरिक शिवजयंतीनिमित्त बुधवारी वडगाव परिसरात भव्य चित्ररथ मिरवणूक विविध मंडळांच्यावतीने काढण्यात आली. पारंपरिक शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी वडगावमध्ये सजीव देखावे सादर केले जातात. यंदा वझे गल्ली, पाटील गल्ली, रयत गल्ली, कारभार गल्ली, सोनार गल्ली, रामदेव गल्ली येथील शिवजयंती मंडळांच्यावतीने चित्ररथ काढण्यात आले. वझे गल्ली येथील मंडळाने सोनार गल्ली कॉर्नरवर मंडप घालून एकाच ठिकाणी देखावे सादर केले. चित्ररथ पाटील गल्ली, कारभार गल्ली, संभाजीनगर, नाझर कॅम्प, सोनार गल्ली येथून मार्गस्थ झाले. देखावे पाहण्यासाठी रात्री 11 नंतर रस्ते गर्दीने फुलले होते. चित्ररथ पाहण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्या होत्या. पाटील गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा देखाव्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत होती. चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी शहापूर पोलिसांच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी विविध शिवजयंती उत्सव मंडळ व पदाधिकाऱ्यांनीही परिश्रम घेतले.