For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवाने स्वत:चे मन आपणहून कृष्णार्पण केले

06:46 AM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवाने स्वत चे मन आपणहून कृष्णार्पण केले
Advertisement

अध्याय तिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, बलराम जाणिवेच्या पलीकडे गेला हे पाहून सर्वसत्ताधीश देवकीसुत भगवान् श्रीकृष्णनाथ ह्यांनीही नियतीच्या संकेताला मान्यता दिली. त्याप्रमाणे ते देहत्याग करून निजधामाला जाण्यास सिद्ध झाले. त्यासाठी सकल सृष्टी धारण करणाऱ्या त्या धराधराने मौन होऊन अश्वत्थातळी वीरासन घातले आणि शार्ङ्गधर श्यामसुंदर स्थिर झाले. त्या स्वरूपाच्या आवडीने शिव, ब्रह्मदेव इत्यादि देवगण वेडे झाले, त्याच्या दर्शनाच्या गोडीने सृष्टीही नादावली. पाचही ज्ञानेंद्रिये भगवंतांच्या रूपाचा आनंद घेण्यास उतावीळ झाली. भगवंताच्या ध्यानस्थ रुपाला पाहून डोळे निवले. डोळ्यांना दृष्टीसुख मिळाल्याचे पाहून इतर ज्ञानेंद्रिये कासावीस झाली. भगवंताच्या रूपाची आपल्यालाही मनसोक्त अनुभूती आली पाहिजे असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी रसनेने त्यांचे कीर्तन आरंभले. त्यातून तिला अतिसुरस अशा कीर्तनरसाची गोडी चाखायला मिळाली. ती गोडी इतकी प्रभावी होती की त्यामुळे विषयरस अगदीच बेचव झाला आणि त्याला संसार निरस वाटू लागला. श्रीकृष्णकीर्ती कानांनी ऐकल्यावर तेही तृप्त झाले. त्यामुळे त्रिविध ताप शांत झाले. कीर्तनातून त्याच्या नामाची कीर्ती वर्णन केल्यावर चारही मुक्ती शरण आल्या. नाकाने श्रीकृष्णाच्या चरणांच्या मकरंदाचा तुळशी मिश्रित सुवासाचा आनंद घेतल्यावर नाकाने परमानंदाची अनुभूती घेतली. त्यापुढे नाकाला इतर सुवास तुच्छ वाटू लागले. नुसत्या कृष्णाच्या उपस्थितीने देहबुद्धीचा नाश होत असे. त्याला पाहणाऱ्या प्रत्येकाला सुखाचा सर्वांगसुंदर प्रत्यय येत असे. त्याचे पाय आवडीने धरले असता मिळणारे सुख समाधीसुखाला लाजवणारे होते. असा तो श्रीकृष्ण अश्वत्थातळी स्वत:च्या सौंदर्यासह बसलेला होता. ते अंतकाळीचे कृष्णध्यान शुक मुनींच्या नजरेपुढे तरळत होते. ते त्यांना खूपच आवडले. ते त्याचे वर्णन करू लागले. ज्ञानघन असलेले शुकयोगींद्र सांगू लागल्यावर राजा परीक्षित ते ऐकायला सरसावून बसला. पिंपळाच्या झाडाखाली श्रीकृष्णांच्या मूर्तीचे वर्णन आता सांगतो. प्रकाशघन असलेल्या आणि स्वत:च्या तेजाने दैदिप्यमान दिसत असलेल्या श्रीकृष्णांनी सर्व दिशा उजळून टाकल्या होत्या. कुठेही धूर नव्हता की ठिणगी दिसत नव्हती तरीही कृष्णमूर्ती इतकी तेज:पुंज दिसत होती की, त्यापुढे सूर्य, चंद्राचे तेज फिके पडत होते. आता ही कृष्णमूर्ती प्रत्यक्षात कशी दिसत होती त्याचे वर्णन पुढे देत आहे. श्रीकृष्णांचे शरीर म्हणजे चैतन्याचा पुतळाच वाटत होता आणि जणू तो शांतीरसाने ओतला होता.

त्या चैतन्याने सर्व दिशांचा कालिमा लोपला होता. कृष्णमूर्ती स्वच्छ स्वयंभू असून त्यांच्या सावळ्या वर्णाने त्यांच्या अंगात नभाचे प्रतिबिंब पडले आहे असे वाटले. त्यामुळे त्यांची घन:श्याम शोभा अधिकच वाढली. त्यांच्या सौंदर्याने सर्वांचे ध्यान त्यांच्याकडेच लागले होते. सर्व स्त्राrपुरुषांचे लक्ष त्यांच्याकडे लागलेले होते ह्यात काहीच नवल नाही कारण त्यांच्या रुपाकडे पाहून संन्यासीही भुलून वेडे झाले.

Advertisement

वास्तविक पाहता संन्याशाना समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी भुलवू शकत नाहीत कारण त्यांना त्यातले मिथ्यत्व पटलेले असल्याने समोर दिसणाऱ्या गोष्टींना ते निरर्थक समजत असतात पण कृष्णमूर्ती मात्र ह्याला अपवाद ठरली कारण त्या मूर्तीत संन्याशाला मोहिनी पडावी असे सामर्थ्य होते. संन्याशाचे राहूदेत जे आधीच विरक्त झालेले परमार्थी आहेत त्यांचेही लक्ष चंद्र, सूर्याचे तेजही फिके पाडणाऱ्या कृष्णमूर्तीने वेधून घेतले. ह्यावरून आपण कृष्णमूर्तीच्या तेजाची कल्पना करू शकतो. विरक्त परमार्थी असलेल्यांचे मुकुटमणी शोभावेत अशा महादेवांनी जेव्हा तेजस्वी कृष्णमूर्ती बघितली तेव्हा शिवांना त्याचेच ध्यान लागले आणि त्यांनी स्वत:चे मन आपणहून कृष्णार्पण केले.

क्रमश:

Advertisement
Tags :

.