तालुका पंचायतीच्या बोटचेप्या धोरणामुळे शिवस्मारकाला धोका
धोकादायक झाडे 10 मेपर्यंत न हटविल्यास उग्र आंदोलन : ट्रस्ट पदाधिकारी, शिवप्रेमींचा इशारा
खानापूर : खानापूर शहराचे भूषण असलेल्या आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारा शिवस्मारक शहरात प्रवेश करणाऱ्याचे लक्ष वेधून घेतो. गेली पंचवीस वर्षे दिमाखात उभा असलेला शिवस्मारक आज तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांच्या बोटचेप्या धोरणामुळे धोकादायक स्थितीत आहे. शिवस्मारकाच्या मागील बाजूस भिंतीला लागून असलेल्या मोठ्या झाडांची मुळे शिवस्मारक इमारतीला भेदत आहेत. त्यामुळे इमारतीला धोका निर्माण झाला आहे. ही धोकादायक झाडे हटवावी म्हणून गेल्या आठ-दहा महिन्यापासून शिवस्मारक ट्रस्टचे पदाधिकारी सातत्याने तालुका पंचायत, जिल्हा पंचायत तसेच वनखाते याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र तालुका पंचायतीचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने शिवस्मारक इमारतीला धोकादायक बनलेली झाडे दि. 10 मे पर्यंत हटविली गेली नाहीत तर उग्र आंदोलनाचा इशारा ट्रस्ट पदाधिकारी तसेच शिवप्रेमींनी दिला आहे.
येथील शिवस्मारकाच्या शेजारी असलेल्या जुन्या कोर्ट आवारात शिवस्मारकाच्या भिंतीला लागून काही झाडे आहेत. या झाडांच्या मुळामुळे शिवस्मारकाच्या भिंतीला तसेच कॉलमला तडे गेले आहेत. त्यामुळे शिवस्मारकाच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. ही बाब शिवस्मारक ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी छायाचित्रासह ता. पं. आणि वनखात्याकडे झाडे हटविण्यासंदर्भात अर्ज केला होता. मात्र या अर्जाची कोणतीही गांभीर्याने दखल ता. पं. ने घेतली नाही. ता. पं. अधिकाऱ्यांना याबाबत ट्रस्टच्या सदस्यांनी विचारणा केली असता वनखात्याकडून झाडे तोडण्यास परवानगी मिळत नसल्याचे सांगून वेळ मारुन नेण्यात येत होती. याबाबत ट्रस्टच्या सदस्यांनी वनाधिकारी सुनिता निंबरगी यांची भेट घेऊन विचारणार केली असता सुनिता निंबरगी यांनी झाडे काढण्यास आमची परवानगी आहे. मात्र कोर्ट आवारात पत्र्याचे शेड उभारली गेली आहेत. ती काढण्यात यावीत, यासाठी आम्ही तालुका पंचायतीशी पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. यावरुनच तालुका पंचायतीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
जुन्या कोर्ट आवारात अनेकांचे अतिक्रमण
जुन्या कोर्ट आवारात अनेकांनी अतिक्रमण करून तात्पुरते शेड उभे करून दुकाने थाटली आहेत. काहींनी दुकाने उभारुन ती भाडेतत्वावर दिली आहेत. मात्र याकडे ता. पं. अधिकाऱ्यांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने ता. पं. अधिकारी आणि अतिक्रमण करणाऱ्यांचे साठेलोटे असल्याची चर्चा होत आहे. शिवस्मारक ट्रस्ट कमिटीच्या सदस्यानी वेळोवेळी ता. पं. कडे तसेच जि. पं. चे अधिकारी राहूल शिंदे यांना झाडे काढण्यासंदर्भात लेखी पाठपुरावा करुनदेखील याकडे गेल्या वर्षभरापासून दुर्लक्ष करण्यात येत आहे. जुन्या कोर्ट आवारात अतिक्रमण करून गाळे उभारले आहेत. ही जागा ता. पं. च्या मालकीची असल्याने या जागेत असलेली शेड काढण्याची जबाबदारी ता. पं. ची आहे. मात्र अनाधिकृतपणे उभारलेल्या पत्र्याच्या शेडना ता. पं. अधिकारी अभय देत आहेत. उलट ट्रस्टच्या सदस्याना अरेरावीची भाषा वापरत आहेत. यावरुनच अतिक्रमण करणारे आणि ता. पं. अधिकाऱ्यात आर्थिक साठेलोटे आहे का, अशी शंका नागरिकांतून उपस्थित होत आहे. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नुकतीच झाडे तातडीने काढण्याची सूचना तालुका पंचायतीच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र अद्यापही झाडे काढण्यांसंदर्भात कोणतीही हालचाल दिसत नाही.