For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवसेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांची न्यायालयात हजेरी

11:08 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवसेनेच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांची न्यायालयात हजेरी
Advertisement

बेळगाव : येळ्ळूरच्या वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेण्यासाठी शिवसेनेचे नेते दिवाकर राऊत व इतर कार्यकर्ते बेळगावात दाखल झाले होते. याचबरोबर पत्रकार परिषदही आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे कर्नाटक पोलिसांनी शिवसेनेच्या त्या नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पाच जणांना न्यायालयाने वॉरंट बजावले होते. ते सर्वजण न्यायालयात सोमवारी उपस्थित राहून वॉरंट रिकॉल करून घेतला आहे. येळ्ळूरच्या त्या घटनेनंतर महाराष्ट्रामध्ये पडसाद उमटले होते. महाराष्ट्रातून नेतेमंडळी बेळगावात दाखल झाली. सदर घटनेचा जाहीर निषेध नोंदविला होता. उद्यमबाग येथील पंचमुखी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पत्रकार परिषद घेण्यास विरोध केला होता. उद्यमबाग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन महाराष्ट्राच्या त्या नेत्यांना तेथून जाण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही सातारा येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, गणपती साळुंखे, दादासा पानसकर, प्रमोद चव्हाण, अभिजित पाटील या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जेएमएफसी चतुर्थ न्यायालयामध्ये सुरू आहे. न्यायालयाने या सर्वांनाच वॉरंट बजावले होते. त्यामुळे सोमवारी हे सर्वजण न्यायालयात हजर होऊन वॉरंट रिकॉल करून घेतला आहे. या कार्यकर्त्यांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते येणार असल्यामुळे येथील शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर, शहर प्रमुख महेश टंकसाळी, विभाग प्रमुख रमेश माळी, राजू कणेरी हे उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.