शिवसेनेचा सवतासुभा : डरकाळी की अपरिहार्यता ?
कोल्हापूर / संतोष पाटील :
राज्याच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला गृहीत धरुनच वाटचाल सुरू असल्याची खदखद होती. गावागावांतील राजकारण करत, अस्तित्वासाठी लढताना महायुतीसह दोन्ही काँग्रेससोबतच एकहात करावे लागणार आहेत. या विचारातून ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आपला सवता सुभा जाहीर केला आहे. जिह्यात दोन्ही काँग्रेससह महायुतीचा मुकाबला करताना ठाकरे गटाला पुन्हा तळापासून पक्षबांधणी करावी लागणार आहे. हे अशक्यप्राय आव्हान पेलेल, असे जिह्यात तुर्तास तरी नेतृत्व ठाकरे गटाकडे नाही. त्यामुळेच सवतासुभा ही शिवसेनेच्या अस्तित्वाची नव्या उमेदीने लढण्याची डरकाळी होती की पक्षीय राजकारणात उठ्ठे काढण्यासाठी केलेली अपरिहार्यता होती, हे येत्या काळातील निवडणुकांचा निकाल आणि त्यानंतरच्या राजकीय वाटचालीनंतरच स्पष्ट होईल.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कोल्हापुरात होती. ज्यावेळी शिवसेना एकसंघ होती आणि राज्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेंव्हा 2021 मध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडतो की काय, अशी परिस्थिती होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजपला सोबत घेतले. मात्र, शिवसेनेला वाढीव जागा दिली नाही, असा आरोप करत शिवसेनेने बँकेच्या निवडणुकीत सवता सुभा मांडला होता.
तत्पूर्वी महापालिकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसला शिवसेनेने मदत केली होती. मात्र सहकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे तत्कालीन नेते मातोश्रीसोबत असलेली जवळीकीचा फायदा घेत स्थानिक नेत्यांना कात्रजचा घाट दाखवत होते. याची मोठी नाराजी स्थानिक नेत्यांमध्ये होती. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेत उभी फुट पडली. लोकसभा निवडणुकीत भावनिक राजकारणाच्या जोरावर ठाकरे गटाने बाजी मारली. मात्र विधानसभा निवडणुकीत सर्वच पातळीवर ठाकरे गटाची पिछेहाट झाली. या जोडीला महाविकास आघाडीही कुमकुवत झाली. महायुतीसोबत लढण्याची, दोन हात करण्याची उमेद सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात राहिली नसल्याचे वास्तव आहे. यातूनच भविष्यातील राजकीय वाटचालीवरुन महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली. याचा परिपाक म्हणून ठाकरे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुकीत फासे उलटे पडले. येत्या महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस नुरा कुस्ती खेळून शिवसेना ठाकरे गटाचा वापर करुन घेतील, अशी अटकळ बांधली जात होती. आता आपापसातील थेट लढतीने रंगत वाढणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येने ताकदीचे उमेदवार आता ठाकरे गटाकडे आहेत का? हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. या निवडणुका लढताना महायुतीच्या तुलनेत ‘मातोश्री’वरुन निवडणुकांसाठी लागणारी रसद मिळणार का? हा मोठा प्रश्न स्थानिक नेत्यांपुढे आहे. लोकसभा निवडणूक गद्दारी आणि भावनिक मुद्यांवर तरली. मात्र, विधानसभा निवडणुकीत फासे उलटे पडले. तेच ते भावनिक राजकारण ठाकरे गटाची राजकीय नैय्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पार करेल का? याचे उत्तर या निवडणुकांच्या निकालातच दडलेलं आहे.
- जिह्यातील ताकद झाली क्षीण!
शिवसेना एकसंघ असताना, गोकुळ दूध संघाप्रमाणेच जिल्हा बँकेत आजी-माजी आमदारांना संधी हवी होती. याआधारे जिह्याच्या राजकारणात वजन कायम राहील, अशी अटकळ ठाकरे गटाच्या नेत्यांची होती. दोन्ही काँग्रेसनी त्यांना फक्त दोन जागा दिल्या आणि तिसरी स्वीकृत संचालकपदाची संगीत खुर्ची शिवसेनेपुढे ठेवली होती. जिल्हा बँकेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसना शिवसेना सोबत राहील, असे वाटले होते. जिह्यातील नेत्यांना ‘मातोश्री’च्या धाकात ठेवून दुसरे पॅनेल होणार नाही, जिह्यातील सेनेचे नेते आपल्या शब्दापुढे जाणार नाहीत, अशी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची अटकळ सेनेच्या पॅनेलमुळे खोटी ठरली होती. आता पुन्हा शिवसेनेनं ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. एकसंघ असताना शिवसेना पर्यायाने ठाकरे गटाकडे ताकदीचे शिलेदार होते. राजकारणासाठी जोडण्या घालण्याची ताकद होती. ती राजकीय ताकद आता क्षीण झाली आहे. येत्या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गटासह दोन्ही काँग्रेसचा सामना ठाकरे गटाला करावा लागणार आहे. त्यामुळे सवतासुभा मांडला तरी या निवडणुकात शिवसेना ठाकरे गटाला अस्तित्वासाठी झगडावे लागणार आहे.
- गडद रेषा अन् पुसट रेषा
शिवसेना उपनेते संजय पवार यांच्यासह जिह्यातील पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाची धुरा सांभाळावी लागणार आहे. हे करत असताना ‘मातोश्री’वरुन या शिलेदारांना महायुतीच्या तुलनेत रसद मिळणार काय? हा मुद्दा आहे. राज्यातील सत्तेनंतर महायुती सुसाट आहे. या सर्व वातावरणात मतदार मात्र स्तब्ध आहे. थेट कोणतीही प्रतिक्रिया येत नाही. मतदारांकडून ना रोष व्यक्त होतोय ना जल्लोष, ही दोलायमान स्थिती स्थानिक निवडणुका जाहीर होईपर्यंत सुरू राहील. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दोन्ही बाजूंनी निकराचे लढे सुरू होतील. शिवसेनेतील दोन्ही गटातील रेषा सुरूवातीपासूनच पुसट आहे, ती अधिक गडद होणार की कसे, हे पाहणे उत्सुकतेचं ठरेल.