Solapur News : शिवसेना उबाठातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन !
सोलापुरात शिवसेनेचा एल्गार: ओल्या दुष्काळाच्या घोषणेची मागणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपयांची मदत राज्य शासनाकडून देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी शिवसेना उबाठाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हंबरडा आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी केले. आंदोलनात मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांना प्रतीकात्मक स्वरूपात झोपलेले दाखवणारे पथनाट्य सादर करण्यात आले. "शासन कुंभकर्णासारखे गाढ झोपले आहे.
शेतकरी हवालदिल झाला आहे, पण सरकार मौन बाळगून आहे. आम्ही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हंबरडा फोडला आहे. जर ओला दुष्काळ तात्काळ जाहीर केला नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि मंत्र्यांना सोलापूरच्या भूमीवर फिरू देणार नाही असा इशारा यावेळी प्रा. दासरी यांनी दिला. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात शिवसेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड, संतोष पाटील, प्रताप चव्हाण, दत्ता गणेशकर, लक्ष्मण जाधव, महेश धाराशिवकर, नाना मोरे, शशिकांत बिराजदार, रवी घंटे, मंगल गोरे, भारती मुनोली आदींनी सहभाग घेतला.