महायुतीत शिवसेना आघाडीवर !
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 113 विधानसभेसाठी निरीक्षक आणि प्रभारी नेमत आघाडी घेतली आहे. एकनाथ शिंदे यांचे महत्त्व महायुतीत चांगलेच वाढले आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार हे बॅक टू पॅव्हिलियनच्या तयारीत आहेत. शरद पवार हे महाराष्ट्राचा दौरा करत असून भाजपचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पवारांनी जशास तसे उत्तर शहा यांना दिल्याने पवारांच्या विरोधात पूर्ण भाजप कामाला लागली आहे.
भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी ही आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगितले जात असले तरी, आता महायुतीत स्थानिक पातळीवर कुरबुरी चालू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 113 विधानसभा क्षेत्रात प्रभारी आणि निरीक्षक नेमत सध्या तरी आघाडी घेतली आहे. महायुतीत 2019 साली शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्व जागांवर शिंदे यांनी निरीक्षक नेमले असून, भाजपने लढवलेल्या तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सध्या आमदार असलेल्या जागांवर निरीक्षक नेमण्याचे मात्र शिवसेनेने टाळले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने काही जागांवर उशिरा उमेदवार नेमल्याने नाशिक येथील हेमंत गोडसे, दक्षिण मुंबईतील यामिनी जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागल्याचे वक्तव्य शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात केले. 2009 पर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना राज्यात मोठा भाऊ तर लोकसभेला भाजप मोठा भावाच्या भूमिकेत होते, मात्र 2014 ला युती तुटल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 122 तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या, त्यानंतर मात्र भाजप हाच राज्यात मोठा भाऊ झाला. 2019 ला पुन्हा एकदा भाजप शिवसेना युती झाली आणि भाजपने शिवसेनेला 124 जागा सोडल्या आणि भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. आता मात्र 113 जागांवर शिंदे गटाने प्रभारी नेमले असल्याने भाजपकडून शिंदे यांना फ्रि हॅन्ड दिला जात असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजपने 288 जागा लढवाव्यात असे वक्तव्य भाजप खासदार नारायण राणे यांनी केल्याने महायुतीत जागावाटपावऊन चांगलीच खळबळ माजली आहे. महायुतीतील प्रमुख पक्षांचे नेते एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून अमित शहा यांच्यासोबतच्या भेटी गाठी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांनी आपला चांगला प्रभाव दाखवला आहे. सध्या महायुती सरकारचा चेहरा म्हणून अनेक योजनांच्या माध्यमातून शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे शिंदे आणि त्यांची शिवसेना हे महायुतीत सध्या बळकट होताना दिसत आहे. लाडकी बहीण-भाऊ योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थयात्रा योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेनंतर आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकार म्हणून भाजपपेक्षा एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व हे उजळत असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा चेहरा हे एकनाथ शिंदेच असतील असे बोलले जात आहे.
दुसरीकडे भाजप नेते अमित शहा यांनी शरद पवारांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपची सगळी मंडळी पवारांना प्रत्युत्तर देण्याच्या कामाला लागली आहेत तर तिकडे अजित पवारांच्या गटातील बाबा जानी दुर्रानी नंतर नरहरी झिरवळ, चेतन तुपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी पुन्हा जुळवुन घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकामागून एक आरोपांची मालिका सुरू केल्याने फडणवीस यांच्या अडचणी वाढत आहेत. दुसरीकडे मराठा समाजाचे मनोज जरांगे हे थेट फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत, त्यामुळे महायुतीत 2009 नंतर मोठ्या भावाच्या भूमिकेत आलेली भाजप सध्या बॅकफुटवर आल्याचे दिसत आहे.
विधीमंडळातून धोतर इतिहासजमा
महाराष्ट्रात धोतर, कुर्ता आणि टोपी असा मराठी माणसाचा पारंपारिक पोशाख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणावर देखील याच पोशाखाचा काही काळ प्रभाव राहिला होता, मग तो राजकारणातील सरपंच असो की आमदार तो धोतरातच दिसायचा. राजकारणावर चित्रित झालेल्या जब्बार पटेल यांचा ‘सिंहासन’ चित्रपट असो की ‘सरकारनामा’ चित्रपटातील यशवंत दत्त यांनी साकारलेला मुख्यमंत्री असो यातील राजकारणी हे धोतरातच दिसले. दादा कोंडके यांनी देखील ‘सासरचे धोतर’ चित्रपट काढून चित्रपटसृष्टीत धोतराचे स्थान अढळ केले होते. मात्र कालांतराने राजकारणातील पिढ्या बदलल्या तसा धोतराचा प्रभाव कमी होऊन नवीन पॅटर्न आला, मोदी जॅकेटचा प्रभाव वाढला. महाराष्ट्राच्या राजकारणातील पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्यापासून अनेक राजकारण्यांचा पेहराव हा धोतर होता. महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यात असे धोतर घालणारे आमदार, मंत्री होते. शेवटच्या काळात माजी मंत्री आनंदराव देवकाते, अण्णा डांगे, मधुकर अण्णा चव्हाण आणि विद्यमान विधानसभेत माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे एकमेव धोतर घालणारे आमदार होते. विधानपरिषदेत पंतगराव कदम यांचे बंधु मोहनराव कदम हे शेवटचे धोतर घालणारे आमदार होते. 2022 ला त्यांची मुदत संपल्यानंतर आत्तापर्यंत विधान परिषदेत कोणी धोतर घालणारे आमदार नियुक्त झाले नाही. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे धोतर आणि काळी टोपी घालणारे होते. काही वादग्रस्त वक्तव्यानंतर तर कोश्यारी यांचे धोतर फेडण्याचे आव्हान देखील त्यांना न आल्याने ते चांगलेच गाजले होते. सध्या माजी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे एकमेव आमदार होते जे धोतर, पांढरी टोपी घालणारे होते. मात्र हरीभाऊंची नुकतीच राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती केल्याने ते आता आगामी विधानसभेत नसणार. सध्याच्या पिढीवर मोदी जॅकेटचा प्रभाव आहे, त्याखाली पॅन्ट किंवा पायजमा घालतात. महाराष्ट्राच्या विधीमंडळातील हरीभाऊ हे धोतर घालणारे शेवटचे आमदार असणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली अनेक वर्षे प्रभाव असणारे धोतर आता इतिहासजमा होणार आहे.
प्रवीण काळे