शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट
आज अल्पकाळासाठी कोल्हापूर दौऱ्यावर : लोकासभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय वर्तुळाचे लक्ष
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज गुरुवार 21 रोजी अल्पकाळासाठी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून ते नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपतींची भेट घेणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हि भेट महत्त्वपूर्ण ठरणार असून संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष उद्धव ठाकरे आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या भेटीकडे असणार आहे. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे.
कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट मोठया ताकदीने लढवणार असल्याची घोषणा केली आहे. येथून महाविकास आघाडीकडुन श्रीमंत शाहू छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यादृष्टीने महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या हालचाली सुरु झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने दावा केला होता. हि जागा शिवसेनेकडेच ठेवण्यासाठी स्थानिक नेते पदाधिकारी यांनीही मातोश्रीवर आग्रह धरला होता. मात्र जिल्ह्यात काँग्रेस प्रबळ असल्यामुळे हि जागा काँग्रेसकडे गेल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. येथून श्रीमंत शाहू छत्रपती हे प्रभावी उदेवार असल्याने कोल्हापूरच्या जागेकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.
दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापूर-सांगली दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी चार वाजता ते कोल्हापूर विमानतळ येथे दाखल होतील. तेथून ते नवीन राजवाडा येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली येथून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ते मिरज येथील जाहीर सभेकडे रवाना होणार आहेत.