For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष! शिवकालीन गड किल्ल्यांचे जतन ही काळाची गरज - युवराज छ.संभाजीराजे

05:27 PM Jun 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा जल्लोष  शिवकालीन गड किल्ल्यांचे जतन ही काळाची गरज   युवराज छ संभाजीराजे
Shiv Rajyabhishek ceremony Raigad
Advertisement

रायगड  / प्रतिनिधी

दुर्गराज किल्ले रायगडावर आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साही, मंगलमय वातावरणात साजरा झाला. या अभूतपूर्व सोहळ्याची क्षणचित्रे याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यातून लाखो शिवभक्तांनी किल्ले रायगड हजेरी लावली होती. शिवभक्तांच्या अलोट गर्दीत आणि शिवगर्जनेने अवघा रायगड यावेळी दुमदुमून गेला होता.

Advertisement

आखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन सोहळा समितीच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षे किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. यावर्षी देखील मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला.  शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी किल्ले रायगडावर तुफान गर्दी लोटली होती. यामुळे किल्ले रायगडचा पायरी मार्ग, रायगड रोप वे शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता. देशभरातून आलेले शिवभक्त  छ.शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत होते, संपूर्ण रायगडची पायवाट आणि रोप वे परिसर शिवमय झाला होता . हातात  भगव्या पताका, फेटे बांधलेले शिवभक्त संपूर्ण परिसरामध्ये दिसून येत होते. महिला मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेत  सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या  होत्या, आज पहाटे श्री जगदीश्वर मंदिरात मध्ये विधिवत पूजन करण्यात येऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. गडावर वाजणारे ढोल ताशे, हलगीवर खेळले जाणारे मर्दानी खेळ, गोंधळ, शाहिरी पोवाड्यांनी संपूर्ण आसमंत निनादून गेला होता. शाहिरांच्या या पोवाड्यांना उपस्थित शिवभक्तांनी देखील दाद दिली. यामुळे गडावर प्रत्यक्ष शिवकाल अवतरल्याचा भास निर्माण होत होता. यावेळी छ.शिवाजी महाराज यांची पालखी ढोल ताशांच्या गजरामध्ये जय जय कार करीत, वाजत गाजत राजसदरेवर आणल्यानंतर करवीर नगरीचे छ.युवराज संभाजी राजे आणि त्यांचे पुत्र शहाजी राजे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे मंत्रघोषात विधिवत पूजन करून मंगलाभिषेक  करण्यात आला. यावेळी पंचजल कुंभातील जल आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. छ.संभाजी राजे यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला आणि राज सदरेसमोर उभारण्यात आलेल्या भव्य सभा मंडपातून  छ.शिवरायांचा जय जयकार सुरू झाला.

यावेळी  युवराज संभाजी राजे यांच्यासह खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, मनोज जरांगे पाटील, आमदार प्रभाकर देशमुख, आमदार बच्चू कडू, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, संभाजी ब्रिगेड चे प्रवीण दादा गायकवाड, श्रीमंत कोकाटे, आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात छ.युवराज संभाजी राजे यांनी ज्या मातीला छ.शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झाला आहे त्या भूमीत त्यांचा वंशज म्हणून काम करताना अभिमान वाटतो. मी आज जो कोणी आहे तो केवळ या छ.शिवरायांमुळे आणि या रायगडामुळे आहे असे स्पष्ट करत रायगड संवर्धन हि काळाची गरज आहे असेही स्पष्ट केले. यावेळी युवराज संभाजी राजे यांनी आपल्या भाषणामध्ये कोणतेही राजकीय भाष्य  केले नाही. ते म्हणाले गड किल्ले हा आपला खरा वारसा आहे, तो जतन करण्याचे प्रत्येक शिवभक्ताचे कर्तव्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले .

Advertisement

या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासनाने किल्ले रायगडावर येणाऱ्या लाखो शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी जय्यत तयारी केली होती. त्याचप्रमाणे रायगड पोलिसां तर्फे विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता गडावर येणाऱ्या वाहनांची वाहतूक कोंडी होऊ नये याची विशेष काळजी पोलीस दलाकडून घेण्यात आली होती. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा त्याच बरोबर शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली होती. किल्ले रायगड तसेच रायगडाचा पायरी मार्ग आणि पाचाड येथे आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय सुविधा उभारण्यात आली होती. यामध्ये सुमारे ३ हजाराहून अधिक रुग्णांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला , पाचाड येथे तीस पेक्षा अधिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या होत्या अशी माहिती डॉक्टर भाग्यरेखा पाटील आणि डॉक्टर संध्या रजपूत यांनी दिली.

किल्ले रायगड वर जाणाऱ्या रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने गडावर जाणाऱ्या शिवभक्तांच्या वाहनांना वाहन चालकांना दुचाकीस्वारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गडावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोंझर आणि वाडा या गावाच्या परिसरात वाहनतळ उभारण्यात आले होते. तसेच शिवभक्तांना गडावर जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे १०० बसेस तैनात करण्यात आल्या होत्या, विशेष म्हणजे आमदार बच्चू कडू शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला किल्ले रायगड वर दाखल झाले होते. त्यांच्या संस्थेच्या सहकार्याने पाचाड आरोग्य केंद्र येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराला शिवभक्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.