शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी दिवशी हिंदू तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. शिवमूर्तीला दुग्धाभिषेक तसेच जलाभिषेक घालून मंत्रोच्चाराने विधिवत पूजन करण्यात आले. कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते कपिलेश्वर मंदिरापर्यंत भव्य देवदर्शन यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये अश्वपथक, ध्वजपथक, वारकरी दिंड्या, पालखी पथक, शस्त्र पथक, हत्ती पथक, शिवछत्रपतींची मूर्ती, धारकरी पथक सहभागी झाले होते. कोल्हापुरातील झांज पथकाने शिवप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर फेटे, अंगात पांढरे सदरे घालून शेकडोंच्या संख्येने शिवभक्त यात्रेमध्ये सहभागी झाले होते.