शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी
बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्यावतीने फाल्गुन वद्य तृतीया शके 1946 या हिंदू तिथीप्रमाणे सोमवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे हा सोहळा पार पडला. या निमित्ताने शिवमूर्ती परिसराला फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रेरणा मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आला. जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील तसेच शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. प्रांतप्रमुख किरण गावडे व विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण यांच्या हस्ते आरती झाली. महिलांनी शिवरायांचा पाळणा गायिला.
किरण गावडे यांनी शिवजयंती तिथीनुसारच साजरी का करावी, याबाबत मार्गदर्शन केले. बलिदान मास काळात शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर मूक पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मागील वीस दिवसांपासून आपण बलिदान मास पाळत आहोत. त्यानिमित्त रविवार दि. 23 रोजी सांगली येथून धर्मवीर ज्वाला सकाळी 7 वाजता बेळगावमध्ये आणण्यात येणार आहे. 29 रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून विधिवत पूजनाने ती ज्वाला शांत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शिवाजी उद्यान ते धर्मवीर संभाजी चौक या दरम्यान मूक पदयात्रा काढली जाणार आहे. छत्रे गुरुजी व रवी जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी विभागप्रमुख चंद्रकांत चौगुले, प्रमोद चौगुले, गजानन निलजकर, महेश जांगळे, गजानन पवार, अतुल केसरकर, महेश गावडे, गजानन पाटील, अमोल केसरकर, विजय कुंटे, आनंद कांबळे यांच्यासह महिलाभक्त उपस्थित होत्या.