मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे शिवप्रताप दिन
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगावच्यावतीने सोमवारी शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भूमीमुक्ती आंदोलनाचे प्रमुख माजी आमदार नितीनराजे शिंदे उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विषद केला. यावेळी बोलताना नितीनराजे शिंदे म्हणाले, प्रतापगडचा संग्राम म्हणजे स्वराज्यावर चालून आलेल्या दहशतवाद्यांना कसे संपवावे हे शिवरायांनी दाखवून दिले. सर्व हिंदूंनी जात, भाषा, पंथ बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. तसेच प्रतापगडावरील अफजलखानाचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार कसा उद्ध्वस्त केला याची त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप नेते धनंजय जाधव यांनी केले होते. यावेळी माजी आमदार अनिल बेनके, पंडित ओगले, महापौर मंगेश पवार, बुडा माजी अध्यक्ष संजय बेळगावकर, युवराज जाधव, मोहन किल्लेकर उपस्थित होते. भाजप नेते विक्रम सोनजी यांच्या नेतृत्त्वाखाली अफजलखान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला.