कडोलीत शिवजयंती मिरवणूक उत्साहात
शिवकालीन देखावे पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी : लाठी, ढाल, तलवारबाजीच्या कसरती
वार्ताहर /कडोली
ढोल-ताशाच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात कडोली येथे शिवजयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. शिवकालीन देखावे पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. शनिवारी सायंकाळी काढण्यात आलेल्या शिवजयंती मिरवणुकीत अयोध्यानगर येथील युवक मंडळाने शिवरायांच्या मूर्तीचा देखावा सादर केला होता. या मिरवणुकीत झांज, ढोल-ताशा पथकाने सर्वांची मने जिंकली. शिवाय या मिरवणुकीत लाठीचार्ज, ढाल, तलवार चालविण्याची कला सादर करण्यात आली. तसेच शिवरायांवर आधारीत पोवाडे सादर केले होते. त्यामुळे उपस्थित शिवप्रेमींत उत्साह दिसून येत होता. रविवारी सायंकाळी लक्ष्मी गल्ली युवक मंडळाच्यावतीने शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मंडळाने ‘गड आला पण सिंह गेला’ या ऐतिहासिक जिवंत देखाव्याचे सुंदर सादरीकरण करून सर्वांची मने जिंकली. दरवर्षीप्रमाणे श्री हनुमान युवक मंडळाने यावर्षीही शिवजयंती मिरवणुकीत देखाव्याची परंपरा राखली. यावेळी शिवरायांचा जयघोष करीत तरुण मंडळी पुरेपूर आनंद लुटताना दिसत होती. गावातील वातावरण शिवमय बनले होते.