For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंती साजरी

10:31 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंती साजरी
Advertisement

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हिंदू तिथीनुसार गुरुवार दि 28 मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात आली. सकाळी छत्रपती शिवाजी उद्यान येथे प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील व शहरप्रमुख अनंत चौगुले यांच्या हस्ते पुष्पहार घालून महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामूहिक आरती झाल्यावर महिलांनी शिवरायांचा पाळणा म्हटला. यावेळी प्रचारक हिरामणी मुचंडीकर यांनी शिवजयंती तिथीनुसार का साजरी केली पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले व बलिदान मास काळात शेवटच्या दिवशी होणाऱ्या धर्मवीर संभाजी महाराज मूक पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रांतप्रमुख किरण गावडे म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली व परकीय सत्तांना धूळ चारून हिंदवी स्वराज्य उभारले. अशा राजांची जयंती ही हिंदू तिथीनुसारच केली पाहिजे. गेली 25 वर्षे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून आपण तिथीनुसारच जयंती साजरी करतो. शिवजयंती तिथी ही धर्मवीर बलिदान मासात येते. त्यामुळेच तिथीनुसार जयंती केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. गेले 20 दिवस आपण धर्मवीर बलिदान मास पाळत असून येत्या काही दिवसात सांगली येथून धर्मवीर ज्वाला बेळगावला येईल व 8 एप्रिल रोजी धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त मूक पदयात्रा काढून विधिवत पूजनाने ज्वाला शांत केली जाईल. यासाठी आपण सर्वांनी जमण्याचे आवाहन त्यांनी केले. ध्येयमंत्राने पूजनाची सांगता करण्यात आली. पौरोहित्य रवी जोशी यांनी केले. यावेळी तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, विभागप्रमुख किरण बडवाण्णाचे, चंदू चौगुले, गजानन निलजकर, प्रमोद चौगुले, मारुती पाटील यांच्यासह बहुसंख्य सदस्य व शिवभक्त उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.