शिरगाव चेंगराचेंगरीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे
पणजी : श्री देवी लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी आणि त्यातील बळींवर तयार करण्यात आलेला सत्यशोधक समितीचा अहवाल गृहखात्याने अभ्यास करुन तो आता अंतिम कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून दिला आहे. आता मुख्यमंत्री त्यावर अंतिम निर्णय घेणार असून पुढील कारवाई निश्चित करणार आहेत. घटनेनंतर काहीजणांच्या बदल्या करण्यात आल्या परंतु कारवाई झालेली नाही. चेंगराचेंगरी होऊन सत्य शोधून काढण्यासाठी सदर समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने तेथे प्रत्यक्ष भेटी देऊन देवस्थान पदाधिकाऱ्यांशी तसेच ग्रामस्थांशी चर्चा करुन नेमके सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचा अहवाल गृहखात्याला सादर केला होता. त्याला आता काही महिने उलटले असून तो अहवाल तेथेच राहिला होता. गृहखात्याने त्यावर टिप्पणी करुन तो आता मुख्यमंत्र्यांकडे कारवाईसाठी पाठवला आहे. महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली सत्य शोधक समिती स्थापन करण्यात आली होती. चेंगराचेंगरीस जबाबदार कोण? हे शोधून काढण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. उत्तर गोवा तत्कालीन जिल्हाधिकारी स्नेहा गीते, उत्तर गोवा एसपी अक्षत कौशल, डिचोली डीवायएसपी जिवबा दळवी, उपजिल्हाधिकारी बी. खोर्जुवेकर, पीआय दिनेश गडेकर, पंचायत सचिव संजय परब आणि इतरांवर अहवालातून ठपका ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. घटनेनंतर चार महिने उलटले तरी कारवाई झालेली नाही.