ऑस्ट्रेलियात 55 वर्षांनी मिळाले जहाजाचे अवशेष
वादळामुळे बुडाले होते जहाज
ऑस्ट्रेलियात 21 जणांचा जीव घेणारे एमव्ही नूनगाह जहाज 55 वर्षांनी शोधण्यात आले आहे. हे जहाज 23 ऑगस्ट 1969 रोजी न्यू साउथ वेल्सनजीक टाउन्सविलेच्या दिशेने जात होते. हे जहाज सुमारे 1300 किलोमीटरचे अंतर कापणार होते. या जहाजावरून 52 जण प्रवास करत होते, तसेच यावर स्टीलने भरलेले कंटेनर होते. 25 ऑगस्टपर्यंत हे जहाज 315 किलोमीटर अंतरापर्यंत पुढे गेले होते, परंतु तेव्हाच या जहाजाचा सामना एका वादळाशी झाला. त्यावेळी या जहाजाचा वेग 110 किलोमीटर प्रतितासाहून अधिक होता, यामुळे जहाजाचे संतुलन सावरता न आल्याने ते बुडाले.
जहाज बुडाल्यावर ऑस्ट्रेलियन नौदलाच्या इतिहासातील सर्वात मोठी सागरी शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. सैन्यविमान, हेलिकॉप्टर्स आणि जहाजांद्वारे एमव्ही नूनगाहचा शोध घेण्यात आला, काही तासांतच चालक दलाच्या 5 सदस्यांसमवेत 26 जणांना वाचविण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाच्या नौदलाला जहाज बुडाल्याच्या 12 तासांनंतर लोक लाकडाच्या मदतीने तरंगताना आढळून आले होते. तेव्हापासून हे जहाज लोकांसाठी एक रहस्य ठरले आहे. जहाजाचा शोध घेण्यासाठी मागील महिन्यात कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या वैज्ञानिकांनी मोहीम हाती घेतली होती. याकरता लोकेशनवर एक अत्याधुनिक जहाज पाठविण्यात आले होते.
170 मीटर खोलवर अवशेष
वैज्ञानिकांना पृष्ठभागापासून 170 मीटर खाली जहाजाचे अवशेष मिळाले आहेत. या जहाजाचे डिझाइन आणि आकार एमव्ही नूनगाह जहाजाशी मिळताजुळता आहे. आता सिडनी प्रोजेक्ट अंतर्गत जहाजाची तपासणी केली जाणार आहे. प्रोजेक्ट अंतर्गत जहाज बुडण्यामागील अचूक कारणांचा शोध घेतला जाणार आहे. आजही त्या आपत्तीच्या आठवणी लोकांच्या मनात घर करून आहेत. जहाज मिळाल्याने स्वकीयांना गमाविलेल्यांना दिला मिळेल अशी अपेक्षा असल्याचे सीएसआयआरओने म्हटले आहे.