For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिंदेसेनेचे ‘उत्तरा’यण...

06:05 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिंदेसेनेचे ‘उत्तरा’यण
Advertisement

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची जागा गमवावी लागणे, ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी मोठीच नामुष्की म्हणावी लागेल. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तथापि, ही जागा खेचून आणून भाजपाने येथून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे कोकणातून प्रथमच धनुष्यबाण हे चिन्ह हद्दपार झाल्याचे दिसून येते. कोकणचा राजकीय इतिहास वळणावळणाचा आहे. एकेकाळी काँग्रेस व समाजवादी विचारधारेचा या भूमीवर प्रभाव होता. मात्र, नव्वदच्या दशकानंतर हळूहळू हा प्रभाव आक्रसत गेल्याचे पहायला मिळते. मुंबईशी कनेक्ट असलेल्या चाकरमान्यांवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने गारूड घातले आणि 1990 नंतर शिवसेना आणि कोकण हे जणू समानार्थी शब्दच बनले. कोकणच्या लाल मातीत सेना केवळ ऊजलीच नाही, तर जोमाने उभी राहिली. खेडोपाड्यात सेनेच्या शाखा सुरू झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सेनेवर कोकणवासियांनी उदंड प्रेम केले आणि बाळासाहेबांचाही कोकणच्या या भूमीवर विशेष लोभ राहिला. या आगळ्यावेगळ्या रसायनामुळेच कोकणातून सेनेच्या माध्यमातून अनेक नेतृत्वे पुढे आली. सेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी व दुसरे मुख्यमंत्री नारायण राणे हेही मूळचे कोकणचेच. राजापूर लोकसभा मतदारसंघातून सुरेश प्रभू यांनी 1996 मध्ये विजय मिळविला. तर अनंत गीते यांनी 1998 मध्ये रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली व सेनेच्या विजयाचा सिलसिला सुरू केला. त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये बाजी मारत त्यांनी हॅट्ट्रिकही नोंदविली. मात्र, 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली व रत्नागिरी व सिंधुदुर्ग या नावाने नव्या ऊपात मतदारसंघ उदयास आला. तर रत्नागिरीतील दोन तालुके जोडून नव्याने रायगड मतदारसंघाचीही निर्मिती करण्यात आली. किंबहुना, पुनर्रचनेनंतरही या मतदारसंघांनी प्रामुख्याने सेनेला पाठबळ दिले. तथापि, अशा सेनेचा धनुष्यबाण कोकणातून बाद व्हावा आणि त्यास एकनाथ शिंदे हे निमित्तमात्र ठरावेत, हे नॅरेटिव्ह अडचणीचेच ठरावे. सेनेकरिता फूट तशी नवी म्हणता येत नाही. बाळासाहेबांच्या काळातही सेनेत तीनदा मोठी फूट पडली होती. छगन भुजबळ व नारायण राणे हे काही आमदारांना सोबत घेऊन अन्य पक्षात गेले. तर पुतण्या राज ठाकरे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत नव्या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु, यापैकी कुणीही पक्षावर दावा करण्याचे धारिष्ट्या दाखविले नाही. ते दाखविले, आनंद दिघे यांचे शिष्य म्हणविणाऱ्या शिंदे यांनी. शिंदे यांनी पक्ष लांबवला, चिन्ह लांबवले आणि पक्षाचे नेतृत्वही मिळविले. परंतु, इतका सारा खटाटोप केल्यानंतरही त्यांना हक्काची जागा वाचविता येत नसेल, तर त्यांच्या नेतृत्वाबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण होते. वास्तविक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळवून देऊन किमान धनुष्यबाण जिवंत ठेवता आला असता. परंतु, शतप्रतिशतवाल्यांपुढे शिंदेंनी साफच शरणागती पत्करलेली दिसते. प्रादेशिक पक्षांचा घास घ्यायची महाशक्तीची भूक किती मोठी आहे, हे आपण वेळोवेळी पाहिले आहे. शिंदेंच्या इतरही जागा त्यांनी मटकावल्या आहेत. त्यात रायगडची जागा राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंसाठी सोडावी लागली आहे. उलटपक्षी रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड या दोन्ही जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपले उमेदवार उतरविले आहे. राणेंविरोधात विनायक राऊत, तर तटकरेंविरोधात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते रिंगणात आहेत. यातून जाणारा संदेश उद्धव ठाकरे यांच्या सेनेसाठी फलदायी ठरू शकतो. त्यात जागा हातची गेल्याने शिंदे गटात निर्माण झालेली नाराजीही त्यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अधिक संभवते. शिवसेनेच्या साह्याने भाजपाने महाराष्ट्रात आपले स्थान निर्माण केले. तथापि, सेनेसोबतच्या युतीमुळे त्यांना कोकणापासून कायम वंचित रहावे लागले. भाजपची ही सुप्त मनीषा आता शिंदे यांच्या सहकार्यामुळे तडीस जाऊ शकेल. राणे यांच्या मुलांबद्दल कितीही मतमतांतरे असोत. परंतु, नारायण राणे यांच्या नावाला आजही कोकणात एक वलय आहे. कोकणच्या विकासातील राणेंचे योगदान त्यांचे विरोधकही नाकारणार नाहीत. राणेंच्या माध्यमातून कोकणात आपली पाळेमुळे ऊजविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. लोकसभेची जागा हिसकावण्यात यश आल्याने पक्षाला आता पुढचे पाऊल टाकता येईल. कमळ हे चिन्ह कोकणच्या जनतेच्या मनावर ठसविण्याची संधी उपलब्ध होईल. ही संधी राणे आणि त्यांच्या भाजपाला साधता येणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ठाकरे ब्रँडशी कोकणचे नेहमीच वेगळे नाते राहिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनाही कोकणाने चांगली साथ दिली. शिंदेंच्या बंडानंतर पक्ष, चिन्ह सगळे काही ठाकरेंकडून हिरावले गेले. त्यामुळे कोकणी माणूस मतपेटीतून कसा रिअॅक्ट होतो, हे बघणे महत्त्वाचे ठरेल. सेना या खेपेला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. आता चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविणे, ही गोष्ट पूर्वीसारखी अवघड राहिलेली नाही. त्यामुळे या आघाडीवर फार काही अडचणी येतील, असे वाटत नाही. त्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मतांची बेरीज सेनेला कुठवर घेऊन जाणार, हेही बघावे लागेल. एकूणच राज्यातील जागावाटपावर नजर टाकली, तर महायुतीच्या जागानिश्चितीवर भाजपाचे व महाविकास आघाडीच्या जागांवर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे वर्चस्व पहायला मिळते. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने 21 जागा पटकावल्या आहेत. भाजपाही 25 जागांपेक्षा अधिक जागांवर लढेल, असे दिसते. याशिवाय भाजपाने शिंदेसेनेला काही जागांवरील उमेदवार बदलण्यासही भाग पाडले आहे. लोकसभेतच विद्यमानांना उमेदवारी देता येत नसेल, तर विधानसभेत काय होणार, हा प्रश्न त्यामुळे अधिक ठळक बनतो. त्यामुळेच शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ दिसतात. कोकणावर पाणी सोडणारा शिंदे गट इतरत्र कशी कामगिरी करतो, यावर त्यांचे भवितव्य ठरेल. त्याचबरोबर ठाकरेंच्याही नेतृत्वाचीदेखील ही परीक्षा असेल. मात्र, हक्काची जागा सोडून शिवधनुष्य खाली ठेवणे, हे नेतृत्वाचे ‘उत्तरा’यणच म्हणायचे.

Advertisement

Advertisement
Tags :

.