For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इफ्फीत शिमगोत्सव, कार्निव्हालचे चित्ररथ

12:42 PM Nov 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
इफ्फीत शिमगोत्सव  कार्निव्हालचे चित्ररथ
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती : वागातोर, मिरामार खुले चित्रपट प्रदर्शन,खाद्य, हस्तकला, प्रदर्शनांचा समावेश

Advertisement

पणजी : राज्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तयारी जोरात चालू असून 15 नोव्हेंबरपर्यंत त्याची कामे पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. या महोत्सवात शिमगोत्सव, कार्निव्हालच्या चित्ररथांची विशेष मिरवणूक आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी महोत्सवाच्या एकंदरित तयारीचा आढावा बैठकीतून घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, महोत्सवाचा उद्घाटन आणि समारोप सोहळा डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार असून 22 नोव्हेंबर रोजी गोवा मनोरंजन सोसायटी (ईएसजी) ते कला अकादमी या मार्गावर चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार आहे. शिमगोत्सव व कार्निव्हल स्पर्धेत बक्षिसे मिळालेल्या चित्ररथांना महोत्सवासाठी  पाचरण करण्यात आले असून त्यांची एकत्रित मिरवणूक काढण्याचे ठरविण्यात आले आहे. चित्रपट सृष्टीशी संबंधित काही चित्ररथ त्या मिरवणुकीत समाविष्ट करण्यात येतील, असे डॉ. सावंत यांनी नमूद केले.

वागातोर, मिरामार येथे चित्रपटांचे प्रदर्शन

Advertisement

यंदा प्रथमच वागातोर (बार्देश) येथील पार्किंग जागेत चित्रपटांचे खुले प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याशिवाय मिरामार समुद्रकिनाऱ्यावर देखील चित्रपट दाखवले जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी चित्रपट मोफत पाहायला मिळतील.

प्रदर्शन, स्टॉल्स उभारणार 

पणजी - मडगांव येथील आयनॉक्स थिएटर, मॅजिक मुव्ही - फोंडा, पणजीतील सम्राट अशोक या चित्रपट गृहात प्रतिनिधींना चित्रपट पहायला मिळणार आहेत. कला अकादमीत विविध सत्रे होणार असून बांदोडकर फुटबॉल मैदानावर विशेष मंडप उभारण्याचे काम चालू आहे. गोवा मनोरंजन सोसायटी (ईएसजी) समोरील जागेत खाद्य पदार्थ, हस्तकला तसेच विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यासाठी परवाने देण्यात येणार असून योगसेतूजवळ विशेष प्रदर्शन भरवले जाणार असल्याचे ते म्हणाले.

दि. 18 रोजी तयारीचा आढावा घेणार

यंदा 20 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार असून त्यासाठी आतापर्यंत 3700 जणांनी प्रतिनिधी म्हणून नोंदणी केली आहे. शेवटच्या काही दिवसात हा आकडा वाढणार असून दरवर्षी सरांसरी 8 ते 9 हजारच्या आसपास प्रतिनिधी नोंदणी होते. यंदाच्या महोत्सवासाठी रु. 26 कोटी खर्च होणार असल्याचे डॉ. सावंत यांनी नमूद केले. येत्या 18 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकंदरित तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली.

Advertisement
Tags :

.