For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळीत शिमगा

06:05 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीत शिमगा
Advertisement

देश जोरदारपणे दिवाळी साजरी करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी शिमगा सुरूच ठेवल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा दीपोत्सव कसा आला आणि कसा गेला हे फारसे कळणे अवघड झाले असे कोणी म्हटले तर ते फारसे चुकीचे ठरणार नाही. नवीन व्यापार समझोता संबंधी वाटाघाटी करण्यासाठी भारताची टीम अमेरिकेत असतानांच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी नवी दिल्लीवर अजिबात दबाव कमी केलेला नाही, याची पावती दिवसेंदिवस मिळू लागली आहे. पंतप्रधानांनी कुआलालम्पूरमधील आंतरराष्ट्रीय परिषदेला जाणे टाळले, ते ट्रम्पना टाळण्यासाठी असे बोलले जात आहे. भारताने रशियन तेल खरेदी करणे बंद केले नाही तर त्यावर वाढीव व्यापार शुल्काचा वज्राघात कोसळेल अशी वारंवार धमकी देणे ट्रम्प यांनी आता सुरु केलेले आहे.

Advertisement

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ट्रम्प यांनी मोदी यांना फोन केला होता तेव्हा पंतप्रधानांनीच आपल्याला भारत आता रशियन तेलाची फारशी खरेदी करणार नाही असे सांगितले, असे राष्ट्राध्यक्ष म्हणत आहेत. युक्रेन युद्ध बंद करण्यासाठी रशियावर चाप लावण्यासाठी मॉस्कोच्या दोन मोठ्या तेल कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध लादल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव भडकले आहेत. भारताकरता ‘इकडे आड तिकडे विहीर’ आहे.

राजधानी दिल्लीत दिवाळीची जी जबर आतषबाजी झाली, फटाके उडवणे झाले, त्याने प्रदूषणाच्या बाबतीत आगीत तेल ओतलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘हिरवे फटाके’ उडवण्याची परवानगी देऊन राजधानीतील वातावरण अजूनच दूषित करण्याचा घाटच जणू घातला असे दावे केले जात आहेत आणि न्यायालयाला त्यात ओढले जात आहे. त्यात कितपत सत्य अथवा कसे ते ज्याचे त्याने ठरवावे पण गुलाबी थंडीकरता प्रसिद्ध असलेली दिल्ली हिवाळ्यात गेले दशकभर अति-प्रदूषित होऊ लागलेली आहे आणि तिच्याकरता कोणीच काही करताना दिसत नाही आहे. या प्रदूषणाचा एव्हढा जबर दुष्परिणाम आहे की राजधानीत राहणाऱ्या लोकांचे त्यामुळे जीवनमान कमी होत आहे. शहरातील प्रत्येक अवयवांवर त्याचा परिणाम होत आहे.

Advertisement

जगातील अतिप्रदूषित राजधानीच्या शहरांमध्ये दिल्लीचा समावेश सर्वात वरच्या स्थानावर होत असल्याने विदेशात भारताची फारशी चांगली ओळख होत नाही हेदेखील सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. येथील विदेशी दूतावासातील वरिष्ठ अधिकारी या प्रदूषणाचा तडाखा आपल्याला बसू नये यासाठी या दिवसात जमेल तसे मायदेशी परतत असतात आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीवावर दूतावास सोडतात असे बोलले जाते. थोडक्यात काय तर पुढील चार महिने राजधानीत कसोटीचे आहेत. सकाळच्या वेळी लोकांनी फारसे घराबाहेर पडू नये, असे यावेळी सांगितले जाते. कारण अशावेळी घराबाहेर चालण्यासारखा केलेला व्यायाम शरीरासाठी उपायकारक होण्याऐवजी अपायकारक आहे, असे सांगितले जाते.

चीनची राजधानी बीजिंगची स्थिती काही काळापूर्वी अशीच होती पण तिथे जाणीवपूर्वक निर्णयांनी परिस्थिती बरीच सुधारलेली आहे. भारतात प्रदूषणविरोधी चळवळ कधीच धारदार झालेली नाही हीदेखील वस्तुस्थिती आहे. 12 वर्षांपूर्वी एक पर्यावरणतज्ञ गंगेवर धरणे बांधू नयेत याकरता ऋषिकेश येथे उपवासाला बसला आणि 110 दिवसांनी त्याने प्राणत्याग केला होता. स्वामी ज्ञानस्वरूप सानंद असे त्याचे नाव होते तो अगोदर आयआयटीमध्ये प्रोफेसर राहिला होता. असे सारे घडूनही देशातील पर्यावरण दिवसेंदिवस खराब होत चालले आहे.

एका स्विस संस्थेने केलेल्या पाहणीनुसार अतिप्रदूषित शहरात दिल्ली जगात नंबर एक आहे तर मुंबई आणि कोलकात्याचा नंबर पहिल्या 10 अति-प्रदूषित शहरात आहे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि इतर ईकॉमर्स कंपन्यांनी तसेच मोठमोठ्या मॉल्सनी दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या खरेदी उत्सवांत विक्रमी व्यवसाय होऊन देशात झालेली रेलचेल दिसली. या उत्सवात 5.4 लाख कोटींचा व्यवसाय झाला असे सांगतले गेले. तर दुसरीकडे मध्यमवर्ग देखील आर्थिकदृष्ट्या किती परेशान झालेला आहे, याची चुणूकदेखील दिसली. लखनौमधून एका राष्ट्रीय साप्ताहिकातून नुकत्याच निवृत्त झालेल्या एका पत्रकाराने समाजमाध्यमांवर आपली कैफियत मांडली. या दिवाळीत मी माझ्या मुलीला भेटू शकलो नाही कारण प्रचंड वाढलेल्या हवाई प्रवासाच्या दरांमुळे मला यावर्षी तिला तिकीट पाठवणेच जमले नाही. या तिकिटाला रुपये 20,000 पडत होते आणि ती देण्याची माझी ऐपत आता राहिलेली नाही, असे दु:ख त्यांनी मांडले. विमान कंपन्यांची वाढलेली भाडी हा एक मोठा मुद्दा बनू लागला आहे आणि सध्या तरी कोणत्याच पक्षाचे त्याकडे लक्ष नाही, असे दिसत आहे.

अयोध्येमध्ये दीपोत्सवाची परंपरा कायम ठेवून योगी आदित्यनाथ यांनी आपली छवी बळकट करण्याचे काम केले. या दिव्यांमध्ये तुपाच्या ऐवजी मोहरीचे तेल वापरण्यात आले असे सांगून विरोधकांनी भाजपची टोपी उडवली. अशाच प्रकारे राजधानीत देखील एक दीपोत्सव साजरा करण्यात आला. उत्सव कोठे संपतो आणि राजकारण कोठे सुरु होते यातील अंतर दिवसेंदिवस धुसर होत चालले आहे.

देश बदल रहा हैं

छठ करता मुंबई, दिल्ली व इतर ठिकाणावरून बिहारकडे सुटलेल्या गाड्या या नेहमीप्रमाणे तुडुंब भरलेल्या दिसल्या आणि ते राज्य म्हणजे खरोखरच मजूर पुरवणारी फॅक्टरी बनलेली आहे, याची प्रचिती परत एकदा आली. बिहारमधील निवडणुकांत भाजप आपले उमेदवारच ‘लूटत’ आहेत असा आरोप करून जन सुराज पार्टीच्या प्रशांत किशोर यांनी एकच खळबळ माजवून दिलेली आहे. आपल्या पक्षाच्या तीन उमेदवारांना नामांकन पत्र परत घेण्यासाठी साक्षात गृहमंत्री अमित शाह यांनी दबाव टाकला, असा त्यांनी आरोप केला आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव हे आता संयुक्तपणे बिहार ढवळून काढणार आहेत.

राजकारण करावे कसे हे भाजपकडून शिकण्याची वेळ इतर पक्षांवर आलेली आहे. राजधानीत भव्य प्रकारे नुकत्याच पार पडलेल्या दुर्गापूजा समारंभात हे दिसून आले. या उत्सवाच्या बऱ्याच अगोदर दिल्लीतील रेखा जैन सरकारने राजधानीतील शेकडो दुर्गापूजा मंडळांच्या प्रतिनिधींची एक बैठक बोलावली आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. त्यातील एक मोठा प्रश्न म्हणजे विविध प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागल्याने या मंडळांची होणारी पळापळ. त्यांना एका ठिकाणी सर्व परवानग्यांची व्यवस्था हवी होती ती तात्काळ मान्य करून अमलातदेखील आणली गेली. इतर काही मागण्या येत्या वर्षात सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. पुढील वर्षी बंगालमध्ये विधानसभा निवडणुका आहेत अशावेळी तेथील हिंदू मते आपल्याबाजूने संघटित करण्यासाठी भाजप किती पद्धतशीरपणे कामाला लागली आहे हे त्यावरून दिसले.

ममता बॅनर्जी गेली पंधरा वर्षे बंगालमधील सत्तेत आहेत आणि यावेळेसदेखील परत एकदा मुख्यमंत्री बनण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. त्या मुस्लिमधार्जिण्या आहेत असा बराच प्रचार भाजप करत असले तरी त्यांनी देखील राज्यातील दुर्गापूजा मंडळांना आपल्या बाजूने वळवण्याचे काम बऱ्याच काळापासून चालवले आहे. दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव वधारले तसेच शेअर बाजाराने उसळी खाल्ली असताना सगळीकडे आनंदी आनंद साजरा होत असताना वर्ल्ड बँकेच्या माजी मुख्य अर्थतज्ञ गीता गोपीनाथ यांनी एक भयानक भाकीत केलेले आहे. अमेरिकेतील शेअर बाजारात आलेल्या अभूतपूर्व तेजीत लवकरच सुधार/बदल होऊन तेथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात संकटात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. असे घडले तर एका झटक्यात 35 ट्रिलियन

डॉलरचा झटका बसून त्याचे पडसाद साऱ्या जगावर उमटतील आणि मंदीचे सावट पसरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. भारताचे सकल उत्पादन 3.5 ट्रिलियन डॉलर आहे यावरून हा झटका किती प्रचंड असू शकतो, याची कल्पना येते. भारतातील झोहो या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीचे संचालक श्रीधर वेम्बू यांनी देखील या भाकिताला दुजोरा दिलेला आहे. 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकट ओढवले होते तेव्हा त्यातून वर यायला सर्वच राष्ट्रांना फार झुंज द्यावी लागली होती. दिवाळीनंतर शिमगा कोणाला नको आहे. पण उद्याच्या गर्भात काय आहे ते केवळ काळालाच माहित आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.