शिखर धवनची ईडीकडून चौकशी
बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात जबाब नोंदवला
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवनची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कथित बेकायदेशीर बेटिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी करत आहे. हे प्रकरण वन-एक्स-बेट नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मशी संबंधित असून ते बेकायदेशीर बेटिंग क्रियाकलापांमध्ये सहभागी असल्याचे बोलले जाते. या प्रकरणात त्याच्या संभाव्य प्रमोशनल किंवा भागीदारी संबंधांची चौकशी सुरू केल्याचे ईडी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यापूर्वी, ईडीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना याचीही चौकशी केली होती. ईडीने शिखर धवनला गुरुवारी सकाळी 11 वाजता एजन्सीच्या मुख्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्याने जबाब नोंदवल्यानंतर प्रमोशन आणि एंडोर्समेंटद्वारे अॅपशी त्याचा काय संबंध आहे हे जाणून घेता येईल. धवन मुख्यालयात पोहोचल्यानंतर लगेचच त्याची चौकशी सुरू झाली. त्याने तपासकर्त्यांसमोर आपले जबाब नोंदवले.