शिगेरू इशिबा पुन्हा जपानचे पंतप्रधान
सार्वत्रिक निवडणुकीत पराभव तरीही मिळाली सत्ता
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानच्या संसदेने शिगेरू इशिबा यांना पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले आहे. सत्तारुढ आघाडीला अलिकडेच एका दशकापेक्षाही अधिक काळातील स्वत:च्या सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. यामुळे इशिबा यांना एक महिन्याने दुसऱ्या मंत्रिमंडळाची स्थापना करणे भाग पडले आहे.
इशिबा यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पार्टी (एलडीपी) आणि सहकारी पक्ष कोमिटोने 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या निवडणुकीत 465 सदस्यीय कनिष्ठ सभागृहात बहुमत गमावले होते. एलडीपीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सत्तारुढ आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सार्वत्रिक निवडणुकीच्या 30 दिवसांच्या आत नव्या नेत्याच्या निवडीसाठी आवश्यक मतदानासाठी सोमवारी संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
देशात 30 वर्षांमध्ये झालेल्या पहिल्या रनऑफमध्ये इशिबा यांनी विरोधी पक्षनेते योशिहिको नोडा यांना 221 विरुद्ध 160 मतांनी पराभूत केले आहे. इशिबा यांनी विदेशमंत्री ताकेशी इवाया, संरक्षणमंत्री जनरल नकातानी आणि मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी समवेत स्वत:च्या बहुतांश मागील कॅबिनेट सदस्यांना पुन्हा नियुक्त केले आहे. तर पराभूत झालेल्या तीन नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
अल्पमतातील सरकार
इशिबा यांनी 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधानपद स्वीकारल्यावर अचानकपणे मुदतपूर्व निवडणुकीची घोषणा केली होती. इशिबा यांना आता अल्पमतातील सरकार चालवावे लागणार आहे. अमेरिकेत आर्थिक आघाडीवर संरक्षणवादी असलेले डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा अध्यक्ष होणार आहेत. तर चीनचे मुख्य विरोधक चीन आणि उत्तर कोरियासोबत त्याचा तणाव वाढत आहे. अशा स्थितीत इशिबा यांना विदेश धोरणाबाबतही संतुलन राखण्याची कसरत करावी लागणार आहे.