For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ईएसआय रुग्णालयाचे लवकरच स्थलांतर

12:19 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
ईएसआय रुग्णालयाचे लवकरच स्थलांतर
Advertisement

सध्याची इमारत जीर्ण झाल्याने निर्णय : महिन्याभरामध्ये जवळच्याच खासगी रुग्णालयात देणार सेवा : केंद्र सरकारकडे केला होता पाठपुरावा 

Advertisement

बेळगाव : ईएसआय रुग्णालयाचा प्रश्न निकालात काढण्यात आला असून, लवकरच रुग्णालयाचे स्थलांतर करण्यात येणार आहे. महिन्याभरामध्ये ईएसआय रुग्णालय जवळच असणाऱ्या एका खासगी रुग्णालयाच्या इमारतीत स्थलांतर होणार आहे. रुग्णालयासाठी आवश्यक असणारी तयारी करण्यात येत आहे. ईएसआय रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्याने नवीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे अशक्य झाले आहे. सरकारकडून ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यास दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे सदर रुग्णालयाचा रुग्णांना आवश्यकतेनुसार उपयोग होताना दिसत नाही. गंभीर स्वरुपाच्या आजारांवर उपचार घेण्याकरिता खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना जावे लागत आहे. त्यामुळे कामगारांची मोठी हेळसांड होत आहे. रुग्णालय असूनही उपयोग होताना दिसत नाही. कामगारांना हक्काचे रुग्णालय उपलब्ध व्हावे. त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता.

रुग्णालयासाठी नवीन इमारत मंजूर

Advertisement

खासदार इराण्णा कडाडी यांच्या पुढाकारातून रुग्णालयासाठी नवीन इमारत मंजूर करण्यात आली आहे. त्यासाठी जुनी इमारत व तेथील क्वॉर्टर्स जमीनदोस्त करणे आवश्यक आहे. या अनुशंगाने ईएसआय रुग्णालय खासगी इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून जागेची शोधाशोध करण्यात येत होती. याकरिता निविदा मागविण्यात आली होती. त्यानुसार निविदेला प्रतिसाद मिळाला असून जवळच असणाऱ्या एका खासगी रुग्णालयाची इमारत उपलब्ध झाली आहे. या इमारतीमध्ये ईएसआय रुग्णालय स्थलांतर करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

त्यानुसार खासगी इमारतीमध्ये ईएसआय रुग्णालयाच्या 10 विभागांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यानुसार खासगी इमारतीमधील सध्या असणाऱ्या रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. ईएसआय रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधेप्रमाणे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. महिन्याभरामध्ये हे काम पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच रुग्णालय खासगी इमारतीमध्ये स्थलांतर क्ढरण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यानंतर ईएसआय रुग्णालय असणाऱ्या ठिकाणी नवीन रुग्णालय उभारण्यास गती येणार आहे. येथील क्वॉर्टर्सही जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्याचे रुग्णालय स्थलांतर होणे आवश्यक आहे.

दिल्लीच्या पथकाकडून पाहणी

चार दिवसापूर्वी दिल्ली येथून आलेल्या एका पथकाकडून रुग्णालयासंदर्भातील माहिती घेण्यात आली असून जागेची पाहणीही करण्यात आली आहे. या पथकाने आवश्यक ती माहिती जाणून घेतल्याचे ईएसआय रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

राज्य ईएसआय रुग्णालयाचे संचालक लवकरच दौऱ्यावर 

राज्य ईएसआय रुग्णालयाचे संचालक लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. पुढील आठवड्यामध्ये त्यांचा दौरा असून स्थलांतरीत करण्यात येणाऱ्या इमारतीची पाहणी केल्यानंतरच रुग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार आहे, असे ईएसआय रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.