केंद्राच्या विविध योजनांचा शेट्टर यांनी घेतला आढावा
विकासकामे जलदगतीने राबविण्याचे निर्देश
बेळगाव : खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, विमानोड्डाण खाते, केएआयडीबी विभाग यासारख्या विविध खात्यांमार्फत राबविण्यात येत असलेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली. बेळगाव (शेगणमट्टी)-हुनगुंद-रायचूर नूतन महामार्ग निर्मितीचा भाग म्हणून पॅकेज 1 व पॅकेज 2 अंतर्गत करावयाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. आतापर्यंत 80 टक्के भूसंपादन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या काही समस्यांवरही तोडगा काढण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी खासदार शेट्टर यांना दिली. बेळगाव शहराबाहेरील रिंगरोड निर्मितीच्या कामाचाही यावेळी आढावा घेण्यात आला.
रिंगरोड निर्मितीच्या कामात उद्भवलेल्या समस्या सोडविण्याचे आणि काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना दिले. बेळगाव तालुक्यातील नावगे आणि बेळगुंदी गावातील रहिवाशांनी रिंगरोडसाठी जमिनी दिल्या आहेत. त्यांना अद्याप भरपाई रक्कम मिळालेली नाही. त्यांना त्वरित भरपाई वितरणासाठी पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सांबरा विमानतळाच्या विकासासाठी बेळगाव वायू दलाने द्यावयाच्या जमिनीबाबतही बैठकीत चर्चा झाली. आगामी काळात या संदर्भात योग्य तोडगा निघेल, असा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला. पावसाळा संपल्याने रिंगरोड, विमानतळ विकास यासारख्या सर्व बाबींना महत्त्व देऊन येत्या काळात प्रस्तावित कामे विनाव्यत्यय पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्या, असे निर्देशही खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला विशेष भूसंपादन अधिकारी जैनापूर आणि चौहान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भुवनेश कुमार आदी उपस्थित होते.