Sangli : फेसाळणारा शेरीनाला पुन्हा कृष्णा नदीत ; सांगलीकरांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह
कृष्णा नदीत पुन्हा मिसळला फेसाळणारा शेरीनाला
सांगली : सांगलीकरांच्या पाचवीला पुजलेला आणि वर्षानुवर्षे चर्चेत राहिलेला फेसाळणारा शेरीनाला पुन्हा एकदा थेट कृष्णा नदीत मिसळू लागला आहे. दोन दिवसापुर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे सांगलीतील नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून सांगलीतील बहुचर्चित शेरीनाला प्रक्रिया न करताच कृष्णेच्या पाण्यात मिसळू लागला आहे. त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका ड्रेनेज आणि आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. नागरिकांतून याबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा नदीत मिसळणारा शेरीनाला महापालिकेची पाठ काही केल्या सोडनासा झाला आहे. दोनच दिवसापुर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे फेसाळणारा शेरीनाला पुन्हा एकदा नदीत मिसळू लागला आहे. रविवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात पांढरा शुभ्र फेस नदीत मिसळत होता. मनपाच्या अधिकाऱ्यांना मात्र काहीच कल्पना नव्हती. शेरीनाल्याचे सांडपाणी शुध्द करून तासगाव तालुक्यातील डुबल धुळगाव येथे शेतीला देण्याची योजना मनपाने राबविली आहे.
यासाठी कवलापूरच्या विमानतळाजवळ सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र उभारले आहे. या केंद्रातील एक पंप नेहमी बंद असतो. शिवाय सांगलीपासून बुधगाव कवलापूरपर्यंत शेरीनाल्याच्या पाईपलाईनला अनेकवेळा गळती लागते. त्यामुळे माधवनगर, बुधगाव कवलापूर आदी गावातील लोकांना दुर्गंधीचा त्रास होतो.
भरीस भर म्हणून रविवारी दिवसभर कृष्णा नदीत शेरीनाल्याचे सांडपाणी आणि फेसाळणारा शेरीनाला थेट नदीत मिसळत होता. पांढऱ्या फेसामुळे नदीचे पात्र एकदूम बदलून गेले होते. कृष्णा नदी आहे की कुठल्या बर्फाळ प्रदेशातील नदी असा भास होत होता. मनपा प्रशासनाला मात्र याबाबत काहीच माहिती नव्हती.