शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार
17 नोव्हेंबरला न्यायालयाचा निर्णय येणार : सैन्याने सांभाळली स्थिती
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण म्हणजेच आयसीटीने माजी पंतप्रधानांच्या विरोधात 17 नोव्हेंबर रोजी निर्णय देण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी दिली आहे. शेख हसीना यांच्या विरोधात मागील वर्षी जुलैमध्ये झालेल्या विद्यार्थी आंदोलनात सहभागी शेकडो लोकांच्या हत्येचा आरोप आहे. तसेच त्यांच्या विरोधात मानवताविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राष्ट्रव्यापी बंद
शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने गुरुवारी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंदमुळे ढाका समवेत देशाच्या अनेक शहरांमधील जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. तर बंद पाहता देशाच्या अनेक महत्त्वपूर्ण स्थानांवर सैन्य आणि पोलिसांसह सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे.
युनूस सरकारकडून गळचेपी
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील अंतरिम सरकारने बांगलादेश अवामी लीग आणि त्याच्याशी संबंधित संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बंदचे आवाहन केले होते. कट्टरवाद्यांच्या दबावाला बळी पडत मोहम्मद युनूस यांनी अवामी लीगला निवडणुकीत भाग घेण्यापासून रोखण्याचे पाऊल उचलले आहे.