शेख हसीना यांच्यावरील खटल्याचा आज निकाल
राजधानी ढाकासह बांगलादेशात सुरक्षा वाढविली
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना कोणती शिक्षा होणार याचा निर्णय आज सोमवारी होणार आहे. हसीना यांच्याविरोधातील खटल्याच्या निकालामुळे बांगलादेशमध्ये आधीच तणाव वाढला आहे. बांगलादेशच्या युनूस सरकारने शेख हसीना यांना फाशीची मागणी केली आहे. जर न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली तर देशातील परिस्थिती बिघडू शकते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर युनूस सरकारने देशभरातील सुरक्षा यंत्रणांना 24 तास आधीच हाय अलर्ट जारी केला आहे. राजधानी ढाकासह संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध एक विशेष न्यायाधिकरण सोमवारी मोठा निकाल देणार आहे. हा खटला गेल्यावर्षीच्या सरकारविरोधी निदर्शनांमध्ये मानवतेविरुद्धच्या कथित गुह्यांशी संबंधित असून त्यासाठी शेख हसीना आणि त्यांचे सहकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कायदा अंमलबजावणी संस्थांनी देशभरात आवश्यक तयारी आधीच पूर्ण केली आहे. बांगलादेशचे आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरण सोमवारी 78 वर्षीय हसीना यांच्याविरुद्ध निकाल देणार आहे.
हसीना यांच्यासोबतच त्यांचे गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस महासंचालक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांच्यावर पाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात आरोपींवर खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांचा आरोप आहे. त्यांच्यावर न्यायाधिकरणासमोर खटला चालवण्यात आला. शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत चाललेल्या या खटल्यात न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. हसीना सध्या भारतातील अज्ञात ठिकाणी आश्रयास आहेत.