शेख हसीना अद्याप बांगलादेशच्या पंतप्रधान
डोनाल्ड ट्रम्प यांना शुभेच्छा संदेश : बांगलादेशातील हालचालींना वेग
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना पुन्हा एकदा चर्चेत आहेत. शेख हसीना यांनी अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना अभिनंदनाचा संदेश पाठविला आहे. या संदेशात शेख हसीना यांनी स्वत:चा उल्लेख बांगलादेशच्या पंतप्रधान असा केला आहे. यामुळे बांगलादेशात आता अचानक घडामोडींना वेग आला आहे. अवामी लीगच्या कार्यालयाच्या सचिवांची स्वाक्षरी असलेले एक पत्र पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहे. यात हसीना यांना ट्रम्प यांच्या असाधारण नेतृत्व गुणांचे कौतुक केले आणि बांगलादेश-अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बांगलादेश अवामी लीगच्या अध्यक्ष (पंतप्रधान) शेख हसीना यांना ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया यांच्यासोबतच्या स्वत:च्या भेटींचा तसेच चर्चेचा उल्लेख या पत्रात केला आहे. याचबरोबर पुढील काळात ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
बांगलादेशात सरकारविरोधी हिंसक निदर्शनांमुळे 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. हसीना आता भारतात आश्रयाला आहेत. हिंसक निदर्शकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात शिरकाव केल्याने तेथील स्थिती बिघडली होती. बांगलादेशच्या सैन्याचे प्रमुख वकार-उज-जमान यांनी पत्रकार परिषद घेत शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केली होती.