शेख हसीना यांना सहा महिन्यांची शिक्षा
वृत्तसंस्था / ढाका
बांगला देशच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांना आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने लवादाचा अवमान केल्याच्या कथित प्रकरणात सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहेत. हसीना यांच्या अनुपस्थितीत ही शिक्षा त्यांना ठोठावण्यात आली. बांगला देशात बंडाळी झाल्यानंतर त्यांनी तो देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे.
शेख हसीना यांच्या सत्ताकाळात त्यांनी केलेल्या कथित गुन्ह्यांची हाताळणी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद स्थापन करण्यात आला आहे. या लवादाने त्यांना नोटीस काढली होती. तथापि, त्या लवादासमोर उपस्थित झाल्या नाहीत. त्यामुळे लवादाची अवमानना झाली, असा निष्कर्ष लवादाकडून काढण्यात आला. त्यामुळे त्यांना ही सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. मात्र, त्या भारतात असल्याने या शिक्षेचे प्रत्यक्ष क्रियान्वयन होणे अशक्य मानले जाते.
आरोप नाकारले
शेख हसीना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये बांगला देशात 1 हजार 400 हून अधिक लोकांच्या हत्या करण्यात आल्या असा आरोप आहे. या हत्या शेख हसीना यांच्या आदेशांवरुन करण्यात आल्या असेही म्हणणे बांगला देशकडून लवादासमोर मांडण्यात आले. लवादाने हसीना यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस काढून स्वत:समोर बोलावले होते. तथापि, त्या उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यांच्यावर लवादासमोर पाच आरोप ठेवण्यात आले आहेत. लोकांच्या हत्या करण्यास प्रोत्साहन देणे, हत्यांकडे दुर्लक्ष करणे, सामुदायिक हत्याकांडे घडविण्यास प्रशासन यंत्रणेला उद्युक्त करणे, आदी पाच आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
अवामी लीगचे वक्तव्य
शेख हसीना यांचा राजकीय पक्ष अवामी लीगवर आता बांगला देशात बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या पक्षाचे कार्य लंडनमधून चालविण्यात येते. लंडन येथे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय लवादावर टीका करणारे वक्तव्य केले आहे. शेख हसीना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. असे असतानाही लवादाने त्यांना किरकोळ कारणावरुन सहा महिन्यांची शिक्षा देणे हा त्यांच्यावर अन्याय आहे, असे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिपादन पेले आहे.