शेख हसीना यांना आता भ्रष्टाचार प्रकरणी शिक्षा
आयसीटीकडून यापूर्वी अन्य प्रकरणी मृत्यूदंड
ढाका : बांगलादेशातील एका न्यायालयाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणी 21 वर्षांची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश मोहम्मद अब्दुल्ला अल मामून यांनी 3 भूखंडांच्या घोटाळ्याप्रकरणी प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हसीना यांना यापूर्वी आयसीटीने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने हसीना आणि त्यांच्या परिवाराच्या सदस्यांच्या विरोधात ढाक्यातील शासकीय भूखंड अवैध पद्धतीने वितरित केल्याप्रकरणी 6 गुन्हे नोंदविले होते. उर्वरित तीन प्रकरणांमध्ये 1 डिसेंबर रोजी निर्णय दिला जाईल. न्यायालयाने हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय आणि कन्या साइमा वाजेद पुतुल यांना 5 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. इंटरनॅशनल क्राइम्स ट्रिब्युनलने जुलै 2024 मधील सरकारविरोधी निदर्शने चिरडण्यासाठी शेख हसीना यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांना मानवताविरोधी गुन्हे ठरविले होते.