For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेफाली वर्माचे विक्रमी द्विशतक, मानधनाचे शतक

06:20 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेफाली वर्माचे विक्रमी द्विशतक  मानधनाचे शतक
Advertisement

शेफाली वर्मा : विक्रमी द्विशतक, स्मृती मानधना : 149 धावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

यजमान भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघातील येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात भारताने दिवसअखेर पहिल्या डावात 4 बाद 525 धावा जमविल्या. सलामीच्या शेफाली वर्माने विक्रमी द्विशतक तर उपकर्णधार स्मृती मानधनाने शतक नोंदविताना पहिल्या गड्यासाठी 292 धावांची भागिदारी केली.

Advertisement

भारताच्या दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाला यापूर्वी वनडे मालिकेत एकतर्फी हार पत्कारावी लागली होती. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या एकमेव सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेफाली वर्मा आणि मानधना या जोडीने पहिल्या चेंडूपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. उपाहारापर्यंत या जोडीने 28 षटकांत बिनबाद 130 धावा जमविल्या होत्या. त्यामध्ये शेफालीचा वाटा 65 तर मानधनाचा वाटा 64 धावांचा होता. मानधनाने 10 चौकारांसह 78 चेंडूत तर शेफालीने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 66 चेंडूत अर्धशतक झळकविले. उपाहारानंतरच्या दुसऱ्या सत्रामध्ये या जोडीने अधिक आक्रमक फटकेबाजी केली. या जोडीने शतकी भागिदारी 148 चेंडूत तर द्विशतकीय भागिदारी 234 चेंडूत नोंदविली. शेफाली वर्माने 2 षटकार आणि 15 चौकारांसह 113 चेंडूत तर मानधनाने 122 चेंडूत 19 चौकारांच्या मदतीने शतक झळकविले. या जोडीने सलामीच्या गड्यासाठी 52 षटकार 292 धावांची भागिदारी केली. चहापानापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या टकेरने मानधनाला झेलबाद केले. तिने 161 चेंडूत 1 षटकार आणि 27 चौकारांसह 149 धावा झळकविल्या. मानधना बाद झाल्यानंतर शेफालीने आपले दीड शतक 158 चेंडूत 5 षटकार आणि 19 चौकारांच्या मदतीने झळकविले. शेफाली वर्मा आणि सतीश शुभा यांनी दुसऱ्या गड्यासाठी 33 धावांची भर घातली. डी क्लर्कने शुभाला 15 धावावर झेलबाद केले. चहापानावेळी भारताने 2 बाद 334 धावा जमविल्या होत्या. भारताने खेळाच्या दुसऱ्या सत्रात 204 धावांची भर घातली.

शेफालीने चहापानानंतर आपले द्विशतक 194 चेंडूत 22 चौकार आणि 8 षटकारांसह पूर्ण केले. भारताच्या 400 धावा 438 चेंडूत नोंदविल्या गेल्या. रॉड्रिग्जने 94 चेंडूत 8 चौकारांसह 55 धावा जमविताना शेफाली वर्मा समवेत तिसऱ्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात शेफाली वर्मा धावचित झाली. तिने 197 चेंडूत 8 षटकार आणि 23 चौकारांसह 205 धावा जमविल्या. टकेरने त्यानंतर रॉड्रिग्जला झेलबाद केले. कर्णधार हरमनप्रित कौर आणि रिचा घोष यांनी दिवसअखेर पाचव्या गड्यासाठी अभेद्य 75 धावांची भागिदारी केली. कौर 2 चौकारांसह 42 तर घोष 9 चौकारांसह 43 धावांवर खेळत आहेत. भारताच्या 500 धावा 570 चेंडूत नोंदविल्या गेल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे टकेरने 2 तर डी क्लर्कने 1 गडी बाद केला.

भारतीय महिला क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमधील गेल्या 89 वर्षांचा जुना विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी म्हणजे 1935 साली इंग्लडच्या महिला संघाने न्युझीलंडविरुध्द खेळाच्या एका दिवसांत दोन बाद 431 धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम भारताने मागे टाकला. 20 वर्षीय शेफालीने 194 चेंडूत द्विशतक नोंदविण्याचा विक्रम करताना यापूर्वीं म्हणजे गेल्या फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियाच्या सदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेविरुध्द 248 चेंडूत द्विशतक पूर्ण करण्याचा विक्रम केला होता.

संक्षिप्त धावफलक

भारत-प.डाव-98 षटकात 4 बाद 525 (शेफाली वर्मा 205, स्मृती मानधना 149, शुभा 15, रॉड्रिग्ज 55, हरमनप्रित कौर खेळत आहे 42, रिचा घोष खेळत आहे 43, अवांतर 16, डी क्लर्क 1-113, टकेर 2-141)

Advertisement
Tags :

.