मासिक पुरस्कारासाठी शेफाली वर्मा, हार्मर यांची शिफारस
वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरूष आणि महिला क्रिकेटपटू पुरस्कारासाठी भारताची सलामीची फलंदाज शेफाली वर्माची शिफारस करण्यात आली आहे. या मासिक पुरस्कारासाठी पुरूषांच्या विभागात द. आफ्रिकेचा सायमन हार्मर, बांगलादेशचा तैजुल इस्लाम आणि पाकचा अष्टपैलू मोहम्मद नवाज यांच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे तर महिलांच्या विभागात शेफाली वर्मा, संयुक्त अरब अमिरातची इशा ओझा आणि थायलंडची थीपतेचा पुथावाँग यांची शिफारस करण्यात आली आहे.
नोव्हेंबर महिन्यातील पुरूषांच्या विभागात या पुरस्कारासाठी दोन फिरकी गोलंदाजांची शिफारस झाली आहे. द. आफ्रिकेचा ऑफ स्पिनर सायमन हार्मर आणि बांगलादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लाम आणि पाकच्या अष्टपैलू मोहम्मद नवाज यांच्यात चुरस राहील. अलिकडेच द. आफ्रिकेने भारताविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका एकतर्फी जिंकली. या मालिकेत हार्मरने 8.94 धावांच्या सरासरीने 17 गडी बाद केले. 25 वर्षानंतर द. आफ्रिकेने भारताचा कसोटी मालिकेत पराभव केला आहे. हार्मरला या मालिकेत सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी मुकुट मिळाला.
आयर्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तैजुल इस्लामने 26.30 धावांच्या सरासरीने 14 गडी बाद केल्याने त्याची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. तसेच तिरंगी मालिकेत पाकने श्रीलंकेचा पराभव करुन अजिंक्यपद पटकाविले. या तिरंगी मालिकेत अष्टपैलू मोहम्मद नवाजची कामगिरी दर्जेदार झाली. त्याने या मालिकेत फलंदाजीत 104 धावा जमविल्या तर गोलंदाजीत त्याने 11 गडी बाद केले.
महिलांच्या विभागात भारताच्या शेफाली वर्माने अलिकडेच भारतात झालेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दर्जेदार कामगिरी केली. शेफाली वर्माने या मालिकेतील द. आफ्रिका विरुद्धच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. तिने या अंतिम सामन्यात सामनावीराचा बहुमान मिळविला. संयुक्त अरब अमिरातची इशा ओझा आणि थायलंडची पुथावाँग यांच्याशी तिला या पुरस्कारासाठी कडवी लढत द्यावी लागेल. बँकॉकमध्ये अलिकडेच झालेल्या महिलांच्या पहिल्या आयसीसी इमर्जिंग नेशन्स चषक स्पर्धेत फलंदाजीत 187 धावा तर गोलंदाजीत 7 गडी बाद करत पुथावाँगने मालिकावीराचा बहुमान मिळविला. पुथावाँगने टी-20 मालिकेत 15 बळी मिळविले. थायलंडने या मालिकेत विजेतेपद पटकाविले होते.