हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून शेफाली वर्माचा सत्कार
वृत्तसंस्था / चंदीगड
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी बुधवारी भारताच्या महिला विश्वचषक विजेत्या संघाची सदस्य शेफाली वर्माचा त्यांच्या येथील अधिकृत निवासस्थानी सत्कार केला. सैनी यांनी तिला शाल, 1.50 कोटी रुपयांचा धनादेश आणि ‘ग्रेड ए 1’ क्रीडा श्रेणीकरण प्रमाणपत्र देवून सन्मानित केले.
हरियाणा राज्य महिला आयोगाने शेफालीची ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली. ‘संत कबीर कुटीर (हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान) येथे हरियाणाची लाडकी मुलगी आणि महिला क्रिकेट विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करुन भारताला विश्वविजेते बनविणाऱ्या संघाची सदस्य शेफाली वर्माला भेटलो आणि या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या,’ असे सैनी यांनी म्हटले आहे.
हरियाणा सरकारच्यावतीने या उत्कृष्ट कामगिरीच्या सन्मानार्थ तिला 1.50 कोटी रुपये रोख आणि अ ग्रेडेशन प्रमाणपत्र देण्यात आले. ही मान्यता हरियाणाच्या क्रीडा प्रतिभेला आणखी उंचीवर नेण्यासाठी प्रेरणा देईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कठोर परिश्रम आणि समर्पणाने शेफालीने केवळ हरियाणाचेच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव केले आहे. ही कामगिरी राज्यातील सर्व मुलींसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या उत्कृष्ट कामगिरीने देशाचे नाव उज्ज्वल करण्यात तुम्ही सतत यशस्वी व्हाल, अशी मी आशा करतो, असे ते म्हणाले.
राज्य सरकार खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवत आहे. राज्यात जवळजवळ 2000 क्रीडा बालवाडी उघडण्यात आल्या आहेत. जिथे तळागाळातील मुलांना प्रगतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जात आहे. शेफालीने हरियाणा सरकारचे आभार मानले आणि म्हटले विश्वचषक जिंकल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे.
हरियाणामध्ये खेळाची भावना रुजलेली आहे आणि राज्यातील प्रत्येक जण खेळांना प्रोत्साहन देतो. जखमी प्रतीका रावलच्या जागी निवड झालेल्या 21 वर्षीय शेफालीने फलंदाजीत 87 आणि गोलंदाजीत 36 धावांत 2 बळी मिळविल्यानंतर तिला प्लेअर ऑफ द फायनल्स म्हणून गौरविण्यात आले.