Kolhapur : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात आज ‘शीतल चंद्रप्रकाश सोहळा’ ; पौर्णिमेच्या तेजात उजळणार प्राचीन मंदिराचा अलौकिक योग!
खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात होणार ‘शीतल चंद्रप्रकाश सोहळा
कोल्हापूर : प्राचीन आणि कलात्मक वैभवाचा वारसा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील भगवान कोपेश्वर मंदिरावर आज रात्री एक दुर्मिळ खगोलीय योग अवतरणार आहे.
वर्षातून एकदाच घडणारा हा 'शीतल चंद्रप्रकाश सोहळा' बुधवारी रात्री ११:४२ वाजता सुरू होईल. पौर्णिमेचा शीतल चंद्रप्रकाश स्वर्गमंडपातील वर्तुळाकार झरोक्यातून थेट खाली असलेल्या 'चंद्रशीला' दगडावर पडेल. हा तेजोमय कवडसा खांब आणि शिल्पाकृतींवर सांडताच संपूर्ण मंदिर परिसर अलौकिक तेजाने उजळून निघेल. या अद्भुत दृश्याला 'शितल चंद्रप्रकाश सोहळा' अस म्हणतात . हा अद्भुत योग पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतून भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने खिद्रापुरात दाखल होत असतात.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, मंदिर परिसरात दीपोत्सव, त्रिपुरा प्रज्वलन आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासन आणि ग्रामस्थांतर्फे वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षा व्यवस्थेची चोख तयारी करण्यात आली आहे.
खिद्रापूरला पोहोचण्यासाठी, कुरुंदवाड-नृसिंहवाडी खिद्रापूर हा मार्ग सर्वात सोयीचा आहे. जवळचे रेल्वे स्थानक जयसिंगपूर आणि मिरज असून, कोल्हापूर विमानतळ देखील जवळ आहे. तरी, या दुर्मिळ आणि अध्यात्मिक सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी भाविकांनी कोपेश्वर मंदिरास अवश्य भेट द्यावी.