शेडगेच्या फलंदाजीने मुंबईला सावरले
वृत्तसंस्था / आगरताला
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या अ इलाईट गटातील सामन्यात शनिवारी खेळाच्या पहिल्या दिवसअखेर मुंबईने पहिल्या डावात त्रिपुरा विरुद्ध 6 बाद 248 धावा जमविल्या. सुर्यनाश शेडगेच्या खेळीने मुंबईला सावरले. पण त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले.
मुंबईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विद्यमान रणजी विजेता मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. यापूर्वीच्या सामन्यात मुंबईने महाराष्ट्राचा पराभव केला होता. शनिवारपासून सुरू झालेल्या या सामन्यात मुंबईचे पहिले दोन फलंदाज लवकर बाद झाले. आयुष म्हात्रे आणि सिद्धांत हे अनुक्रमे 4 आणि 5 धावांवर बाद झाले. रघुवंशीने 28 तर कर्णधार अजिंक्य रहानेने 35 धावा जमविताना या जोडीने 54 धावांची भागिदारी केली. मुंबईचे हे दोन्ही फलंदाज पाठोपाठ बाद झाले. त्यावेळी त्यांची स्थिती 4 बाद 87 अशी होती. शेडगे आणि सिद्धेश लाड यांनी पाचव्या गड्यासाठी 70 धावांची तर शेडगेने मुलानी समवेत सहाव्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी केली. लाडने 29 धावा जमविल्या. 21 वर्षीय शेडगेने 93 चेंडूत 4 षटकार आणि 10 चौकारांसह 99 धावा जमविल्या. त्रिपुरातर्फे मणीशंकर मुरासिंग आणि अभिजित सरकार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 60 षटकात 6 बाद 248 (शेडगे 99, रहाने 35, रघुवंशी 28, सरकार आणि मुरासिंग प्रत्येकी 2 बळी)