For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी हिरेबागेवाडी येथे उभारणार शेड

12:18 PM Oct 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी हिरेबागेवाडी येथे उभारणार शेड
Advertisement

मनपा आयुक्त शुभा बी. यांची माहिती : प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ

Advertisement

बेळगाव : भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्यामुळे त्यांच्या निर्बीजीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. शहरात निर्बीजीकरणासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने हिरेबागेवाडी येथे तात्पुरते शेड उभारले जाणार असून, यामध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाणार असल्याची माहिती मनपा आयुक्त शुभा बी. यांनी दिली. चार दिवसांपूर्वी गांधीनगर येथे एका चिमुकलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिचे लचके तोडले होते. यामध्ये ती बालिका गंभीर जखमी झाली होती. शहरात चार दिवसातून एकदा तरी कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परंतु, प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

तात्पुरते शेड उभारणार

Advertisement

मागील आठ दिवसात भटक्या कुत्र्यांना पकडून श्रीनगर येथील शेल्टरमध्ये निर्बीजीकरण केले जात होते. परंतु, भटक्या कुत्र्यांच्या वाढलेल्या संख्येमुळे जागा अपुरी पडत होती. त्यामुळे शहरालगत एखादी मोठी जागा असणे आवश्यक होते. यासाठी हिरेबागेवाडीजवळ एका जागेची पाहणी करण्यात आली असून, लवकरच त्या ठिकाणी तात्पुरते शेड उभारून निर्बीजीकरणाची प्रक्रिया केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांवर कारवाई करणार 

भटक्या कुत्र्यांना काही ठिकाणी हॉटेलमधील शिल्लक खाद्यपदार्थ तसेच चिकन-मटण टाकले जात आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे चिकन-मटण दुकानातील शिल्लक अवयव टाकणे तसेच हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न उघड्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.